महायुती सरकार कोकणच्या मुळावर उठले, इटलीतून हद्दपार केलेला विनाशकारी रासायनिक प्रकल्प लोटे परशुराममध्ये

हद्दपार करण्यात आलेला विनाशकारी प्रकल्प कोकणात लोटे येथे आणण्यात आला आहे. आरोग्यासाठी अतिशय हानिकारक असलेला हा रासायनिक प्रकल्प रत्नागिरीच्या लोटे परशुराम एमआयडीसीत सुरू झाला आहे. या प्रकल्पामुळे कोकणातील निसर्गसौंदर्याबरोबरच तेथील जनतेचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती आहे.

लक्ष्मी ऑरगॅनिक्स इंडस्ट्रीजच्या विवा लाइफसायन्सेस या उप कंपनीच्या माध्यमातून हा प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पाची पाळेमुळे इटलीमध्ये आहेत. मायटेनी ही इटालीयन कंपनी तेथील विसेन्झा शहरात ‘फॉरेव्हर केमिकल’ (पीएफएएस) नावाचे रसायन करत होती. या प्रकल्पातून सोडण्यात येणाऱया सांडपाण्यामुळे आसपासचे जलस्रोत प्रचंड दूषित झाल्याचे व हे पाणी प्यायल्यामुळे घातक रासायनिक घटक मानवी शरीरात जाऊन आरोग्याला अपाय होत असल्याचे तपासणीत आढळून आले. याचे गांभीर्य लक्षात घेऊन 2018मध्ये मायटेनी कंपनीचा हा प्रकल्प कायमचा बंद करण्यात आला. मायटेनीचा हाच भयानक प्रकल्प आता रत्नागिरीत येऊ घातला आहे. पंपनीची यंत्रसामुग्री, तंत्रज्ञान व पेटंट्स लक्ष्मी ऑरगॅनिक्सने खरेदी केले आहेत.

पीएफएएस किती घातक?

फॉरेव्हर केमिकल (पीएफएएस) म्हणजे पर अँड पॉलिफ्लोरो अल्काईल घटक. हे रसायन एकदा बनल्यानंतर कधीच नष्ट होत नाही. औद्योगिक कारणासाठी याचा वापर झाल्यानंतर प्रकल्पातील सांडपाण्यातून ते इतर जलस्रोतात मिसळते. एकदा पाण्यात मिसळले की साध्या शुद्धीकरण प्रक्रियेद्वारे ते वेगळे करता येत नाही. पाण्याद्वारे शरीरात गेल्यावर ते जीवघेणे ठरू शकते. या रसायनामुळे रोगप्रतिकार शक्तीवर परिणाम होतो. मूत्रपिंड व वृषण कर्करोगाचा धोका संभवतो. प्रजनन समस्या, थायरॉईड, मुलांची वाढ खुंटण्याची भीती असते. कोलेस्ट्रॉल, रक्तदाब वाढतो. यकृताची कार्यपद्धती बिघडते.

मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यायला हवे – काँग्रेस

पीएफएएसमुळे निर्माण होणाऱया आजारांबद्दल धोक्याचा इशारा देणारा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. यावर काँग्रेसचे प्रवत्ते सचिन सावंत म्हणाले, ‘हे प्रचंड खतरनाक आहे. कोकणातील जनतेचे आयुष्य संपवण्याचा हा घाट आहे. पंपनीला परवानगी कशी मिळाली आणि आता ही पंपनी कोणते उत्पादन घेणार आहे, याची चौकशी व्हायला हवी. मुख्यमंत्री यावर उत्तर देतील अशी अपेक्षा आहे, असे सावंत यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे.

उद्योगमंत्र्यांचा प्रतिसाद नाही

लक्ष्मी ऑरगॅनिक्सच्या प्रकल्पावरून वादळ उठलेले असताना राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांची याबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी दै. ‘सामना’ने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळू शकला नाही. सामंत हे आज रत्नागिरी दौऱयावर होते.
आतापर्यंत 4 हजार लोकांचा मृत्यू

‘या पंपनीच्या प्रदूषणाच्या संदर्भात 2024मध्ये एक सर्व्हे झाला होता. त्यानुसार चार हजार लोकांचा प्रदूषणामुळे मृत्यू झाला आहे. विसेन्झाच्या स्थानिक कोर्टाने प्रदूषणाच्या मुद्दय़ावरून पंपनीच्या संचालकांसह 11 अधिकाऱयांना 141 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षाही ठोठावली होती, अशी माहिती जनस्वास्थ अभियानचे राष्ट्रीय सहसंयोजक डॉ. अभय शुक्ला यांनी दिली.

रसायन तेच, दुष्परिणामही तेच होणार

‘वेस्ट डोन्ट वाँट वेस्ट’ अशी एक म्हण आहे. वेस्ट अर्थात पश्चिमेतील देशांना असे वेस्ट (घातक टाकाऊ रसायने) नको असते. मग अशा घातक कंपन्या ते आपल्या देशात पाठवतात. तीच पंपनी, तीच उपकरणे आणि तेच केमिकल, मग आरोग्यावर दुष्परिणाही तेच होणार आहेत. मुळात आपले सरकार अशा कंपनीला परवानगी देतेच कशी, असा सवाल त्यांनी केला.

पन्नास वर्षांनी दुष्परिणाम पुढे येतील!

पीएफएएस या रसायनाचे हार्मोन्सवरही परिणाम होतात. ही रसायने बनवणारी मायटेनी कंपनी 1965 पासून सुरू होती. त्याचे घातक परिणाम 2019मध्ये लक्षात आले. मग कंपनी बंद झाली. आपल्याकडे 40 ते 50 वर्षांनी त्याचे दुष्परिणाम समोर येतील, मग काय करणार? असा सवाल डॉ. अभय शुक्ला यांनी केला.

Comments are closed.