वर्ल्ड कपपूर्वी फॉर्मात परतणार! – सूर्यकुमार यादव

हिंदुस्थान टी-20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने प्रथमच उघडपणे मान्य केले आहे की, गेल्या काही महिन्यांत त्याचा फॉर्म अपेक्षेप्रमाणे राहिलेला नाहीये. मात्र, 7 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱया टी-20 वर्ल्ड कपपूर्वी आपण पूर्ण फार्मात परतलेले असू, असा विश्वासही त्याने व्यक्त केला आहे.
गेल्या एका वर्षात तिसऱया व चौथ्या क्रमांकावर खेळताना सूर्यकुमार 22 डावांत एकही अर्धशतक करू शकलेला नाही. या कालावधीत त्याची सरासरी 12.84, तर स्ट्राइक रेट 117.87 इतका राहिला आहे. अलीकडेच द. आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत त्याच्या धावा अनुक्रमे 12, 5, 12 आणि 5 अशा राहिल्या. वर्ल्ड कपपूर्वी आता त्याच्याकडे केवळ पाच टी-20 सामने उरले आहेत.
टी-20 वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर झाल्यानंतर बीसीसीआयच्या मुंबईतील मुख्यालयात माध्यमांशी संवाद साधताना सूर्यकुमार म्हणाला, ‘हा टप्पा थोडा लांबलेला आहे. प्रत्येक खेळाडूच्या कारकिर्दीत असा काळ येतो. कुठे चूक होत आहे, हे मला माहीत आहे आणि त्यावर कसे काम करायचे, हेही. न्यूझीलंडविरुद्धची मालिका आणि वर्ल्ड कपपूर्वी सुधारण्यासाठी माझ्याकडे वेळ आहे. तुम्ही सूर्याला दमदार पुनरागमन करताना नक्कीच पाहाल.’
कर्णधारपद मिळाल्यानंतर फॉर्म घसरला
2024च्या टी-20 वर्ल्ड कप विजयानंतर रोहित शर्माच्या जागी कर्णधारपद स्वीकारल्यानंतर सूर्यकुमार यादवचा फॉर्म सातत्याने चर्चेत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मागील मालिकेत तीन डावांत तो केवळ एकदाच 20 धावांचा टप्पा ओलांडू शकला. इंग्लंडविरुद्ध वर्षाच्या सुरुवातीला पाच डावांत तो दोनदा शून्यावर बाद झाला, तर त्याची सर्वेच्च धावसंख्या केवळ 14 होती.

Comments are closed.