दिव्यात कुत्रा चावल्याच्या घटनेनंतर उपचार सुरू असतानाच 5 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू, आरोग्य यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न

दिवा शहरातील साईबाबा नगर, अविष्का चाळ दिवा-आगासन रोड परिसरात कुत्रा चावल्याच्या घटनेनंतर उपचार सुरू असतानाच ५ वर्षीय निशा शिंदे या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना अत्यंत गंभीर असून यामुळे महापालिका प्रशासन व सार्वजनिक आरोग्य यंत्रणेच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
१७ नोव्हेंबर रोजी घराबाहेर खेळत असताना एका पिसाळलेल्या कुत्र्याने चिमुकलीवर हल्ला केला होता. त्यानंतर तिला तातडीने डोंबिवली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू करून आवश्यक इंजेक्शन्स दिल्याची माहिती देण्यात आली.
पुढील काही आठवडे तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते. ३ डिसेंबर रोजी तिचा वाढदिवस साजरा करण्यात आला, त्यावेळी तिची प्रकृती स्थिर असल्याचे कुटुंबीयांना सांगण्यात आले होते. मात्र १६ डिसेंबर रोजी चौथे इंजेक्शन दिल्यानंतर अचानक तिची प्रकृती बिघडली आणि रेबिजची लक्षणे दिसू लागल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. परिस्थिती गंभीर झाल्यानंतर तिला मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र तेथे पोहोचल्यानंतर तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
या प्रकरणाची सखोल, निष्पक्ष व पारदर्शक चौकशी होणे अत्यावश्यक आहे, जेणेकरून वस्तुस्थिती समोर येईल. उपचार सुरू असताना दीर्घ कालावधीनंतर रेबिजची लक्षणे दिसणे हे गंभीर स्वरूपाचे असून उपचार पद्धती, औषधांचा दर्जा, वैद्यकीय निरीक्षण व संदर्भ प्रक्रियेबाबत वस्तुनिष्ठ तपास होणे आवश्यक आहे, या प्रकरणात कोणतीही वैद्यकीय अथवा प्रशासकीय त्रुटी झाली आहे का, याची सक्षम यंत्रणेमार्फत चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख ॲड. रोहिदास मुंडे यांनी केली.

Comments are closed.