भारतीय गोलंदाजाकडे मोठा वर्ल्ड रेकॉर्ड मोडण्याची सुवर्णसंधी, फक्त इतक्या विकेट्सची गरज

वनडे वर्ल्ड कप विजेती भारतीय महिला क्रिकेट टीम सध्या श्रीलंकेविरुद्ध टी20 मालिका खेळत आहे. 5 सामन्यांच्या या मालिकेला 21 डिसेंबर रोजी विशाखापट्टणम येथे सुरुवात झाली. पहिल्याच सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेवर 8 गडी राखून दणदणीत विजय मिळवला.

या विजयात स्टार फलंदाज जेमिमा रोड्रिग्जचा मोलाचा वाटा होता. तिने 44 चेंडूत 10 चौकारांच्या मदतीने नाबाद 69 धावांची शानदार खेळी केली. या कामगिरीसाठी तिला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ म्हणून गौरवण्यात आले. गोलंदाजीत क्रांती गौड, श्री चरणी आणि अनुभवी दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी एक विकेट घेत महत्त्वाची भूमिका बजावली.

पहिल्या टी20 मधील दमदार विजयानंतर भारत आणि श्रीलंका 23 डिसेंबर रोजी दुसऱ्या टी20 मध्ये आमनेसामने येणार आहेत. या सामन्यात भारतीय गोलंदाज दीप्ती शर्मा हिच्याकडे इतिहास रचण्याची सुवर्णसंधी आहे.

दीप्ती टी20 क्रिकेटमध्ये 150 विकेट्स पूर्ण करण्याच्या अगदी उंबरठ्यावर आहे. तिला यासाठी फक्त 2 विकेट्सची गरज आहे. तिने आतापर्यंत 130 टी20 सामन्यांतील 127 डावांत 18.99 च्या सरासरीने 148 विकेट्स घेतल्या आहेत. जर ती पुढील सामन्यात 2 श्रीलंकन फलंदाजांना बाद करण्यात यशस्वी ठरली, तर टी20 मध्ये 150 विकेट्स घेणारी भारताची पहिली आणि जगातील दुसरी गोलंदाज बनेल. सध्या हा विक्रम फक्त ऑस्ट्रेलियाच्या मेगन शट हिच्याच नावावर आहे.

दीप्ती शर्मा ही भारताची स्टार अष्टपैलू खेळाडू आहे. तिने अनेकदा फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागांतून संघाला विजय मिळवून दिला आहे. ‘टी20 क्रिकेटमध्ये तिच्या नावावर 130 सामन्यांतील 81 डावांत 1100 धावा नोंद आहेत.

टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या महिला गोलंदाज

मेगन शट (ऑस्ट्रेलिया) – १५१
दीप्ती शर्मा (भारत) – १४८*
हेन्रिएट इशिमवे (रवांडा) – १४४
निदा दार (पाकिस्तान) – १४४
सोफी एक्लेस्टोन (इंग्लंड) – 142

Comments are closed.