INDW vs SLW: दुसऱ्या विजयासाठी टीम इंडिया सज्ज, श्रीलंकेचं आव्हान उभं राहणार?

आयसीसी वनडे वर्ल्ड कप ट्रॉफी उंचावल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघ मायदेशात 2025 मधील अखेरची टी20 मालिका खेळत आहे. श्रीलंकेविरुद्ध आयोजित करण्यात आलेल्या 5 सामन्यांच्या या मालिकेत टीम इंडियाने विजयी सुरुवात करत आपली ताकद दाखवून दिली आहे.

रविवारी, 21 डिसेंबर रोजी झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने पूर्णपणे वर्चस्व राखत श्रीलंकेवर 8 विकेट्सने एकतर्फी विजय मिळवला. या विजयासह भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली असून उर्वरित सामन्यांसाठी आत्मविश्वासही वाढला आहे.

आता सलग दुसरा सामना जिंकून मालिका विजयाकडे आणखी एक पाऊल टाकण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. दुसरीकडे, मालिकेत टिकून राहण्यासाठी श्रीलंकेसमोर पलटवार करण्याचं मोठं आव्हान असेल. त्यामुळे मालिकेच्या दृष्टीने हा सामना श्रीलंकेसाठी ‘करो या मरो’ ठरण्याची शक्यता आहे.

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसरा टी20 सामना मंगळवारी, 23 डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे. हा सामना विशाखापट्टणम येथील एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियममध्ये रंगणार आहे.

या सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार असून, त्याआधी सायंकाळी 6.30 वाजता नाणेफेक होईल. चाहत्यांसाठी हा सामना पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

हा सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील विविध चॅनेल्सवर थेट पाहता येणार आहे. तसेच मोबाईल आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर सामना जिओहॉटस्टार ॲपवर लाईव्ह स्ट्रीम केला जाणार आहे.

दुसऱ्या सामन्यात भारताचं नेतृत्व हरमनप्रीत कौर करणार आहे, तर श्रीलंकेची धुरा अनुभवी चमारी अट्टापट्टू हिच्याकडे असेल. पहिल्या सामन्यात भारताने 122 धावांचं लक्ष्य अवघ्या 2 विकेट्स गमावून सहज पार केलं होतं.

Comments are closed.