विजय हजारे ट्रॉफीत विराट-रोहितची कमाई किती? एका सामन्यासाठी किती पैसे मिळणार

भारतीय डोमेस्टीक क्रिकेटसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहली आगामी विजय हजारे ट्रॉफी 2025-26 मध्ये खेळताना दिसणार आहेत. 24 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या या प्रतिष्ठित 50 षटकांच्या स्पर्धेमुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे.

रोहित शर्मा मुंबई संघाकडून खेळणार असून, मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) याची अधिकृत माहिती दिली आहे. रोहित संघाच्या पहिल्या दोन सामन्यांसाठी उपलब्ध असतील. शार्दुल ठाकूरच्या नेतृत्वाखालील मुंबई संघ जयपूर येथे दाखल होणार असून, मुंबईचा समावेश एलीट ग्रुप ‘C’ मध्ये करण्यात आला आहे. रोहितचा सहभाग मुंबईसाठी अनुभव आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरणार आहे.

दुसरीकडे, विराट कोहली दिल्ली संघासाठी मैदानात उतरणार आहे. दिल्ली अँड डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनने (DDCA) विराटची सुरुवातीच्या सामन्यांसाठी उपलब्धता निश्चित केली आहे. दिल्ली संघाचे कर्णधारपद ऋषभ पंतकडे सोपवण्यात आले असून, आयुष बडोनी उपकर्णधार असेल. दिल्लीचे सामने बेंगळुरूमध्ये खेळवले जाणार आहेत.

विजय हजारे ट्रॉफी 2025-26 ची लीग फेरी 8 जानेवारी 2026 पर्यंत चालणार असून, त्यानंतर नॉकआउट सामने खेळवले जातील. अंतिम सामना 18 जानेवारी रोजी होणार आहे. कसोटी आणि टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित आणि विराट सध्या फक्त वनडे क्रिकेटवर लक्ष केंद्रित करत आहेत. न्यूझीलंडविरुद्ध 11 जानेवारी 2026 पासून सुरू होणाऱ्या घरगुती वनडे मालिकेपूर्वी ही स्पर्धा त्यांच्यासाठी महत्त्वाची सराव संधी ठरणार आहे.

मॅच फीबाबत बोलायचे झाल्यास, विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळाडूंना त्यांच्या लिस्ट ‘A’ अनुभवाच्या आधारावर मानधन दिले जाते. 41 किंवा त्यापेक्षा जास्त लिस्ट ‘A’ सामने खेळलेल्या खेळाडूंना प्रति सामना 60 हजार रुपये मिळतात. विराट कोहली आणि रोहित शर्मा दोघांनीही 40 पेक्षा अधिक सामने खेळले असल्याने त्यांना प्रति सामना 60 हजार रुपये मिळणार आहेत.

विराट कोहली दिल्लीकडून तीन सामने खेळू शकतो, त्यामुळे त्याची एकूण कमाई सुमारे 1.80 लाख रुपये होऊ शकते. तर रोहित शर्मा मुंबईकडून दोन सामने खेळणार असल्याने त्याला सुमारे 1.20 लाख रुपये मिळतील. मोठे स्टार्स घरगुती क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार असल्याने विजय हजारे ट्रॉफीचा थरार यंदा आणखी वाढणार, यात शंका नाही.

Comments are closed.