भारतीय खेळाडूंच्या वागण्यावरून मोहसीन नकवी संतापले, तक्रार करण्यासाठी ICC चे दार ठोठावणार

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष मोहसीन नकवी (Mohsin Naqvi) यांनी अंडर-19 आशिया कपच्या फायनलदरम्यान भारतीय खेळाडूंनी चिथावणीखोर वर्तन केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाची अधिकृत तक्रार आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (ICC) करण्याबाबत ते विचार करत आहेत.

दुबईमध्ये रविवारी झालेल्या आशिया कप फायनलमध्ये पाकिस्तानने भारताचा 191 धावांनी पराभव केला. सामन्यादरम्यान दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये अनेकदा बाचाबाची झाली. विशेष म्हणजे, सामना सुरू होण्यापूर्वी आणि संपल्यानंतर दोन्ही संघांच्या खेळाडूंनी एकमेकांशी हस्तांदोलन (Handshake) देखील केले नाही.

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात मोहसीन नकवी म्हणाले, फायनलदरम्यान भारतीय खेळाडू पाकिस्तानी खेळाडूंना सतत चिथावणी देत होते. आम्ही या घटनेची माहिती अधिकृतपणे आयसीसीला देऊ. राजकारण आणि खेळ नेहमी वेगळे ठेवले पाहिजेत.
पाकिस्तान संघाचे मेंटॉर आणि मॅनेजर सरफराज अहमद यांनीही नाराजी व्यक्त केली. भारतीय तरुण खेळाडूंची वागणूक आणि वृत्ती अयोग्य होती, असा आरोप त्यांनी केला आहे.

जरी पाकिस्तानने अधिकृत तक्रार केली, तरी आयसीसी केवळ मॅच रेफरीने दिलेल्या रिपोर्टवरच विचार करेल. बाहेरील विधानांपेक्षा मॅच रेफरीची नोंद महत्त्वाची मानली जाते.

यावर्षी एप्रिलमध्ये पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (ज्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता) दोन्ही देशांमधील संबंध अधिक बिघडले आहेत. भारत सरकारने पाकिस्तानसोबतच्या सर्व द्विपक्षीय (Bilateral) क्रीडा मालिकांवर बंदी घातली आहे. मात्र, ऑलिम्पिक चार्टरचा हवाला देत बहुराष्ट्रीय (Multinational) स्पर्धांमध्ये खेळण्यास मुभा दिली आहे, कारण अशा स्पर्धांमध्ये राजकीय कारणावरून भेदभाव करण्यास मनाई असते.

Comments are closed.