रोहित-विराटपाठोपाठ शुबमन गिलही खेळणार विजय हजारे ट्रॉफी, जाणून घ्या कधी आणि कुठे होणार सामने?
भारतीय कसोटी आणि वनडे संघाचा कर्णधार शुबमन गिल (Shubman gill) 3 जानेवारी आणि 6 जानेवारीला पंजाबसाठी ‘विजय हजारे ट्रॉफी’चे दोन सामने खेळणार आहे. त्याने पंजाब क्रिकेट असोसिएशनला (PCA) आपल्या उपलब्धतेबद्दल कळवले असून, रणजी ट्रॉफीचे उर्वरित सामने खेळण्याची इच्छाही व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे रोहित शर्मा (Rohit Sharma & Virat Kohli) आणि विराट कोहली यांनीही या स्पर्धेत खेळण्याचे आधीच जाहीर केले आहे.
3 जानेवारीला सिक्कीम विरुद्ध आणि 6 जानेवारीला गोवा विरुद्ध गिल मैदानात उतरेल. हे दोन्ही सामने जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर होतील. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेनंतर, 22 जानेवारीपासून सौराष्ट्र विरुद्ध आणि 29 जानेवारीपासून कर्नाटक विरुद्ध होणाऱ्या रणजी सामन्यांमध्येही तो पंजाबकडून खेळण्याची शक्यता आहे.
टी-20 वर्ल्ड कपसाठीच्या भारतीय संघातून बाहेर पडल्यानंतर गिल आता घरगुती सामन्यांद्वारे लय मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. जयपूरमधील सामने खेळल्यानंतर तो 18 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी वडोदरा येथे भारतीय संघात सामील होईल.
पंजाब क्रिकेट असोसिएशनला आशा आहे की, भारताच्या या दिग्गज फलंदाजाच्या येण्याने संघाची कामगिरी सुधारेल. सध्या पंजाबचा संघ ‘ग्रुप बी’ मध्ये 5 सामन्यांत फक्त एक विजय मिळवून सहाव्या क्रमांकावर आहे.
Comments are closed.