रोहित-विराटची विजय हजारेमध्ये एन्ट्री! एका मॅचसाठी मिळणार इतकी रक्कम
घरगुती क्रिकेटसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली विजय हजारे ट्रॉफी 2025-26 मध्ये खेळताना दिसणार आहेत. रोहित शर्माचा मुंबईच्या संघात समावेश करण्यात आला असून, तो संघाच्या पहिल्या दोन सामन्यांसाठी उपलब्ध असेल, याला मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) दुजोरा दिला आहे.
टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा, शार्दुल ठाकूरच्या नेतृत्वाखालील संघात जयपूरमध्ये सामील होईल, जिथे मुंबईचा एलिट ग्रुप सी मध्ये समावेश करण्यात आला आहे. विराट कोहलीनेही दिल्लीच्या सुरुवातीच्या सामन्यांसाठी आपल्या उपलब्धतेची पुष्टी केली आहे. दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनने (DDCA) या स्टार फलंदाजाचा सुरुवातीच्या फेरीसाठी संघात समावेश केला आहे. दिल्लीच्या संघात ऋषभ पंतला कर्णधार आणि आयुष बडोनीला उपकर्णधार बनवण्यात आले आहे. दिल्लीचे हे सामने बेंगळुरूमध्ये खेळवले जाणार आहेत.
विजय हजारे ट्रॉफी 2025-26 ची सुरुवात (24 डिसेंबर 2025) पासून होणार आहे. या स्पर्धेतील साखळी फेरीचे (League Stage) सामने 8 जानेवारी 2026 पर्यंत चालतील, त्यानंतर बाद फेरीचे (Knockout) सामने होतील आणि अंतिम सामना 18 जानेवारीला बेंगळुरूमध्ये खेळवला जाईल.
रोहित आणि विराट कसोटी आणि टी20 क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर आता भारतासाठी फक्त एकदिवसीय (ODI) क्रिकेट खेळतात. न्यूझीलंडविरुद्ध (11 जानेवारी 2026) पासून सुरू होणाऱ्या घरगुती एकदिवसीय मालिकेपूर्वी, सरावासाठी (Match Practice) रोहित आणि विराट या स्पर्धेत सहभागी होत आहेत
विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळण्यासाठी खेळाडूंना त्यांच्या ‘लिस्ट ए’ (List A) अनुभवाच्या आधारे प्रति सामना मानधन मिळते. ज्या खेळाडूंनी 41 किंवा त्यापेक्षा जास्त लिस्ट ए सामने खेळले आहेत त्यांना प्रति सामना 60000 रुपये, 21 ते 40 सामने खेळलेल्या खेळाडूंना 50000 रुपये आणि 0 ते 20 सामने खेळलेल्या खेळाडूंना प्रति सामना 40000 रुपये मिळतात. राखीव खेळाडूंना (Reserve Players) या रकमेच्या निम्मी रक्कम दिली जाते.
टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने 40 पेक्षा जास्त लिस्ट ए सामने खेळले आहेत, त्यामुळे त्याला प्रति सामना 60000 रुपये मिळतील. दिल्लीसाठी विराट तीन सामने खेळण्याची शक्यता आहे, अशा परिस्थितीत तो विजय हजारे ट्रॉफीमध्ये एकूण 1.80 लाख रुपये कमवू शकतो. रोहित शर्मासाठीही प्रति सामना मानधन विराइतकेच असेल. रोहित मुंबईसाठी दोन सामने खेळणार आहे, त्यामुळे या स्पर्धेत तो 1.20 लाख रुपये कमवेल.
Comments are closed.