Ratnagiri News – कोतवड्याच्या घारपुरेवाडीत लोकसहभागातून वनराई बंधारा, महिलांच्या श्रमदानातून वेतोशी नदीत गावासाठी जलसाठा

रत्नागिरी पंचायत समितीने आज एका दिवसात मिशन बंधारे उपक्रमांतर्गत 95 ग्रामपंचायतीमध्ये पाचशेहून अधिक बंधारे बांधण्याची मोहीम हाती घेतली. कोतवडे गावच्या घारपुरेवाडीत बचतगट महिलांच्या लक्षणीय आणि ग्रामस्थांच्या श्रमदानातून वेतोशी नदीवर वनराई बंधारा बांधण्यात आला. या बंधाऱ्यामुळे जलसाठ्याचा दृश्यपरिणाम तात्काळ दिसून आला. गावासाठी आता हा बंधारा उपलब्ध होणार आहे.

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गटविकास अधिकारी चेतन शेळके यांच्या नेतृत्त्वाखाली आज एकाच दिवशी 95 ग्रामपंचायतींमध्ये पाचशेहून अधिक बंधारे बांधण्याची मोहीम राबविण्यात आली. याअंतर्गत कोतवडे गावच्या घारपुरेवाडीत वेतोशी नदीवर सकाळी 9 वाजल्यापासून श्रमदानाला सुरुवात झाली. यात सरपंच संतोष बारगुडे, ग्रामपंचायत अधिकारी देविदास इंगळे, ग्रामपंचायत सदस्य ज्योती मयेकर, दिया कांबळे, अनुजा धावळे, कृषी अधिकारी व्ही. एस. कोडलकर, सुनिल घारपुरे, बचतगटाच्या सीआरपी समृध्दी सोनार, सुरभी शितप यांच्यासह बचतगटाच्या महिला, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ सहभागी झाले होते.

वेतोशी नदीतील पाणी वाहून पुढे जात होते. त्यामुळे त्याचा गावाला फारसा फायदा होत नव्हता. या मोहिमेंतर्गत नदीवर वनराई बंधारा बांधल्याने त्याचा दृश्यपरिणाम तात्काळ दिसून आला. बंधाऱ्याच्या अलीकडे जलसाठ्यात लगेचच झालेली वाढ दिसून आली. हा जलसाठा गावच्या फायद्यासाठी विशेषत: शेतीसाठी, प्राणीमात्रांसाठी वा अन्य कामांसाठी आता उपयोगात येणार आहे.

Comments are closed.