भारताला वर्ल्ड चॅम्पियन बनवणाऱ्या जेमिमा रॉड्रिग्जचे झाले प्रमोशन! 'या' संघाने दिली मोठी जबाबदारी
दिल्ली कॅपिटल्सने महिला प्रीमियर लीग (WPL) 2026 च्या हंगामापूर्वी भारतीय फलंदाज जेमिमा रॉड्रिग्ज हिची कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. 25 वर्षीय जेमिमाने अलीकडेच आयसीसी महिला विश्वचषकात भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. तिने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 339 धावांच्या विक्रमी लक्ष्याचा पाठलाग करताना नाबाद 127 धावांची शानदार खेळी केली होती. एका अहवालानुसार जेमिमा म्हणाली, “दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद भूषवणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. माझ्यावर विश्वास दाखवून या संघाचे नेतृत्व करण्याची संधी दिल्याबद्दल मी संघ मालक आणि सपोर्ट स्टाफची आभारी आहे.” तीने पुढे नमूद केले की, “विश्वचषक जिंकणे आणि आता महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामापासून माझ्या हृदयात खास स्थान असलेल्या या फ्रँचायझीमध्ये ही मोठी संधी मिळणे, हे माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी खरोखरच एका स्वप्नवत वर्षासारखे राहिले आहे.”
दिल्ली कॅपिटल्सने डब्ल्यूपीएलच्या (WPL) पहिल्याच लिलावात सर्वात आधी जेमिमा रॉड्रिग्जची निवड केली होती. तिने आतापर्यंत 27 डब्ल्यूपीएल सामन्यांमध्ये 139.67 च्या स्ट्राईक रेटने 507 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे, लीगच्या तिन्ही हंगामांतील अंतिम सामने खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये तिचा समावेश आहे. गेल्या महिन्यात झालेल्या लिलावापूर्वी, फ्रँचायझीने ऑस्ट्रेलियाची माजी कर्णधार मेग लॅनिंग हिला संघातून मुक्त (रिलीज) केल्यानंतर, जेमिमाने दिल्ली कॅपिटल्सच्या नेतृत्वाची धुरा सांभाळली आहे. विजयाचा निर्धार
या संदर्भात बोलताना जेमिमा म्हणाली, “मी गेल्या तीन वर्षांत बरेच काही शिकले आहे आणि दिल्ली कॅपिटल्ससोबत काही उत्तम क्षण अनुभवले आहेत. आमच्याकडे एक मजबूत संघ आहे आणि मी मैदानात उतरण्यासाठी खूप उत्सुक आहे. आम्हाला या हंगामात मोठे यश मिळेल अशी आशा आहे. गेल्या तीन वर्षांपासून जे जेतेपद आमच्यापासून थोडक्यात हुलकावणी देत आहे, ते मिळवण्याचा आमचा निर्धार आहे.”
जेमिमा रॉड्रिग्जने 113 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 14 अर्धशतकांच्या मदतीने 2444 धावा केल्या आहेत. या काळात तिची सरासरी 30.93 राहिली आहे. तसेच, तिने भारतासाठी 59 एकदिवसीय (ODI) सामन्यांमध्ये 3 शतके आणि 8 अर्धशतकांसह 1749 धावा केल्या आहेत.
Comments are closed.