महिला क्रिकेटपटूंच्या मानधनात 100 टक्के पेक्षा जास्त वाढ का? बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सांगितलं मोठं कारण!
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) महिलांच्या देशांर्गत (Domestic) क्रिकेटसाठी मानधनात मोठी वाढ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला (Rajiv Shukla) यांनी या निर्णयाचे कौतुक केले असून, यामुळे अधिक मुली क्रिकेटकडे आकर्षित होतील आणि खेळाचा दर्जा सुधारेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
रिपोर्टनुसार, बीसीसीआयने महिला खेळाडूंच्या दैनंदिन मानधनात 100 टक्क्यांहून अधिक वाढ केली आहे. दिवसाला मॅच फी 20,000 रुपयांवरून थेट 50,000 रुपये करण्यात आली आहे.
राखीव (Reserve) खेळाडूंची फी दिवसाला 10,000 रुपयांवरून 25,000 रुपये करण्यात आली आहे.
2025 मध्ये भारतीय महिला संघाने पहिल्यांदाच एकदिवसीय विश्वचषक (ODI World Cup) जिंकला. या ऐतिहासिक विजयानंतर महिला क्रिकेटची लोकप्रियता वाढली असून, बीसीसीआयने खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ही वेतनवाढ लागू केली आहे.
बीसीसीआयचे माजी सचिव जय शाह यांच्या नेतृत्वाखाली महिला क्रिकेटमध्ये अनेक क्रांतिकारक बदल झाले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरुष आणि महिला खेळाडूंना समान मॅच फीस देण्याचा निर्णय घेण्यात आला. महिला प्रीमियर लीग (WPL) सुरू झाल्यामुळे खेळाडूंना आर्थिक स्थैर्य आणि जागतिक स्तरावर आपली कला दाखवण्याचे व्यासपीठ मिळाले. गावपातळीवर (Grassroot Level) मुलींना क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले.
राजीव शुक्ला ‘एएनआई’शी बोलताना म्हणाले, बीसीसीआयने महिला क्रिकेटला चालना देण्यासाठी हे मोठे पाऊल उचलले आहे. आधी आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर वेतन समानता आणली आणि आता देशांतर्गत क्रिकेटमध्येही मोठी वाढ केली आहे. ही 100 टक्क्यांहून अधिक वाढ असून यामुळे महिला क्रिकेटचा दर्जा नक्कीच उंचावेल.
Comments are closed.