ऐतिहासिक क्षण! तमाम मराठी माणसांच्या मनासारखं घडणार… उद्धव ठाकरे-राज ठाकरे करणार शिवसेना आणि मनसे युतीची घोषणा!!
महाराष्ट्र आणि मराठी माणसाला प्रतीक्षा असलेला ऐतिहासिक क्षण अखेर आला आहे. तमाम मराठी माणसाच्या मनासारखं घडत आहे. शिवसेना आणि मनसे युतीचा निर्णय झाला आहे. मुंबईसह राज्यातील विविध महापालिकांची निवडणूक दोन्ही पक्ष एकत्रितपणे लढणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे उद्या दुपारी 12 वाजता युतीची अधिकृत घोषणा करणार आहेत. या पत्रकार परिषदेबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.
उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या आदेशानुसार, दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून जागावाटपासह विविध मुद्दय़ांवर चर्चा सुरू होती. ही चर्चा पूर्ण झाली आहे. शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांना आज ही माहिती दिली. शिवसेना-मनसे युतीची घोषणा उद्या होणार आहे. यात आता लपवण्यासारखे काही नाही, असे संजय राऊत यांनी सांगितले.
‘मुंबईच्या निवडणुकीपुरता काँग्रेसबाबतच्या चर्चेला पूर्णविराम मिळालेला आहे, मात्र पुणे, नाशिक, मीरा-भाईंदरमध्ये काँग्रेसशी चर्चा सुरू आहे. मुंबईत स्वतंत्र लढण्याचा त्यांचा निर्णय आहे. त्यांची काही गणितं असू शकतात. मात्र कोणतीही कटुता न ठेवता निवडणूक लढून भविष्यात निकाल झाल्यानंतर मुंबईच्या रक्षणासाठी एकमेकांना कशी मदत करता येईल, यावर वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली आहे,’ असे संजय राऊत यांनी सांगितले.
जागावाटप निश्चित
‘मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, पुणे, नाशिक या प्रमुख महापालिकांमध्ये आम्ही एकत्र लढणार आहोत. तेथे चर्चा पूर्ण झालेली आहे. शिवसेना आणि मनसेमधील जागावाटप पूर्ण झाले आहे. सगळे काही सुरळीत पार पडले आहे,’ असे संजय राऊत यांनी सांगितले.
पवारांनी यावे अशी इच्छा
‘शरद पवार यांचा पक्ष मुंबईच्या निवडणुकीत आमच्यासोबत आहे. स्वतः उद्धव ठाकरे हे जयंत पाटील व अन्य नेत्यांशी चर्चा करत आहेत. त्यांच्याबरोबरची चर्चा पूर्ण झाली तर तेही उद्याच्या पत्रकार परिषदेला उपस्थित राहावेत अशी आमची इच्छा आहे. त्यांना निमंत्रण देऊ,’ असे संजय राऊत यांनी सांगितले.
स्थळ
हॉटेल ब्ल्यू सी, वरळी सीफेस
महाराष्ट्रद्वेष्टय़ांचे बारा वाजणार! युतीची पोस्ट सोशल, तुफान मीडियामध्ये ओळखला जात होता
युतीची घोषणा होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना व मनसेने पक्षाच्या अधिकृत ‘एक्स’ हँडलवरून खास पोस्ट शेअर केल्या आहेत. या दोन्ही पोस्ट तुफान गाजल्या. ‘उद्या 12 वाजता महाराष्ट्रद्वेष्टय़ांचे 12 वाजणार’ असे ट्वीट शिवसेनेने केले आहे. तर मनसेने आपल्या हँडलवर उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे एकत्र आल्याचा वरळी डोमच्या मेळाव्यातील भगव्या रंगाच्या पार्श्वभूमीचा फोटो पोस्ट केला आहे.
Comments are closed.