कार्ती चिदंबरम यांच्या अडचणीत वाढ
चिनी व्हिसा घोटाळा प्रकरण : आरोप निश्चित करण्याचा न्यायालयाचा आदेश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीतील एका न्यायालयाने चिनी व्हिसा घोटाळ्याशी निगडित सीबीआय प्रकरणात काँग्रेस खासदार कार्ति पी. चिदंबरम आणि अन्य जणांच्या विरोधात आरोप निश्चित करण्याचा आदेश मंगळवारी दिला आहे. हे प्रकरण 2011 शी संबंधित असून तेव्हा कार्ति यांचे पिता पी. चिदंबरम हे केंद्रीय गृहमंत्री होते.
पंजाबच्या तालवंडी साबो पॉवर लिमिटेड नावाच्या कंपनीच्या ऑर्डर अंतर्गत 2011 मध्ये एका ऊर्जा प्रकल्पाचे काम सुरू होते, ज्यात चिनी कर्मचारी काम करत होते. या चिनी कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रकल्प व्हिसा जारी करण्यात आले होते. या चिनी नागरिकांना भारतात काम करण्यासाठी व्हिसा मिळवून देण्यात अवैध पद्धतीने मदत करण्याच्या बदल्यात कार्ति यांनी लाच स्वीकारल्याचा आरोप आहे.
न्यायालयाने याप्रकरणी भास्कर रमन यांनाही आरोपी केले आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी 16 जानेवारी रोजी होणार आहे. कायदेशीर प्रक्रिया मला अनेक मार्ग उपलब्ध करणार असून त्या सर्व मार्गांचा मी वापर करणार असल्याची टिप्पणी काँग्रेस खासदार कार्ति चिदंबरम यांनी केली आहे.
कार्ति चिदंबरम आणि अन्य 7 जणांच्या विरोधातील प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या विशेष न्यायाधीशांनी 7 आरोपींच्या विरोधात आरोप निश्चित करण्याचा आदेश दिला. तर या प्रकरणी चेतन श्रीवास्तव नावाच्या इसमावरील आरोप हटविण्याचा आदेश दिला.
यापूर्वी ऑक्टोबर 2024 मध्ये सीबीआयने कार्ति चिदंबरम आणि अन्य जणांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले होते. 2011 साली 263 चिनी नागरिकांना व्हिसा जारी करण्याशी संबंधित कथित घोटाळ्याप्रकरणी आरोपींच्या विरोधात ईडीने मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा नोंद केला होता.
Comments are closed.