उन्नाव प्रकरणात सेंगरला जामीन मंजूर झाला.
दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय, अटीही लागू
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
काही वर्षांपूर्वी गाजलेल्या उन्नाव बलात्कार प्रकरणी कनिष्ठ न्यायालयात दोषी ठरलेले आणि शिक्षा भोगत असलेले भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार कुलदीपसिंग सेनगर यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून जामीन संमत झाला आहे. 15 लाख रुपयांच्या हमीवर त्यांना जामीन देण्यात आला आहे. सेनगर त्यांनी त्यांच्या शिक्षेच्या विरोधात उच्च न्यायालयात अपील केले आहे. त्या अपीलावर निर्णय होत नाही, तो पर्यंत त्यांचा जामीन राहील, असे स्पष्ट केले गेले आहे.
जामीन संमत करताना दिल्ली उच्च न्यायालयाने सेनगर यांच्यावर अनेक अटी लागू केलेल्या आहेत. या प्रकरणातील पिडितेचे वास्तव्य ज्या स्थानी आहे, त्या स्थानापासून पाच किलोमीटरच्या अंतरात सेनगर यांनी येऊ नये. तसेच प्रत्येक सोमवारी त्यांनी पोलिस स्थानकात उपस्थित राहिले पाहिजे. त्यांना या प्रकरणाचा निर्णय होईपर्यंत देश सोडता येणार नाही. पिडितेला सेनगर किंवा त्यांच्या वतीने कोणाकडूनही धमकी दिली जाता कामा नये. तसेच या पिडितेला भय वाटेल, अशी कोणतीही कृती सेनगर किंवा त्यांच्या वतीने अन्य कोणाकडून होता कामा नये, अशा अनेक अटी दिल्ली उच्च न्यायालयाने जामीनासाठी लागू केल्या आहेत. अटी न पाळल्यास जामीन रद्द होईल, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रकरण काय आहे…
उन्नाव बलात्कार प्रकरण 2017 मधील आहे. त्यावेळी ते साऱ्या देशाला हादरवून टाकणारे ठरले होते. त्यावेळी एका अल्पवयीन युवतीने कुलदीप सिंग सेनगर यांच्यावर बलात्कार केल्याचा गंभीर आरोप केला होता. या प्रकरणी बराच काळ न्याय न मिळाल्याच्या कारणास्तव या पिडितेने मुख्यमंत्री निवासाच्या बाहेर आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला होता. ही घटना समोर आल्यानंतर तिची देशभर चर्चा झाली होती. पिडितेच्या पतीचाही पोलीस कोठडीत संशयास्पद मृत्यू झाला होता. तसेच तिची काकी आणि वकील यांचाही एका मार्ग अपघातात मृत्यू झाला होता. तसेच ही पिडिताही गंभीर जखमी झाली होती. उत्तर प्रदेशातील हे प्रकरण दिल्लीच्या न्यायालयात हस्तांतरीत करण्यात आले होते. दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयाने कुलदीप सिंग सेनगर यांना आजन्म कारावासाची शिक्षा केली होती. ती शिक्षा ते भोगत होते. तसेच त्यांच्यावर 25 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला होता. या दंडाची रक्कम पिडितेला भरपाई म्हणून देण्याचा आदेश तीस हजारी न्यायालयाने दिला होता. आता दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सेनगर यांना जामीनावर मुक्त करण्यात येत आहे. मात्र, त्यांनी कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाविरोधात केलेले अपील अद्याप प्रलंबित आहे. या अपीलाची सुनावणीमध्ये सेनगर यांचे भवितव्य ठरणार आहे. ही सुनावणी लवकरात लवकर व्हावी, अशी मागणी पिडितेच्या कुटुंबियांच्या कडून करण्यात येत आहे.
Comments are closed.