कहर कामगिरी.!! अवघ्या 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीने एबी डिव्हिलियर्स आणि बाबर आझमचे विक्रम मोडले
बिहारच्या युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने विजय हजारे ट्रॉफीत इतिहास रचत संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. अंडर-19 आशिया कपमध्ये भारताला विजेतेपद मिळवून देता न आल्याची खंत असली, तरी विजय हजारे ट्रॉफीतील पहिल्याच सामन्यात वैभवने वर्ल्ड क्रिकेटमधील अनेक विक्रम आपल्या नावावर केले. रांचीच्या जेएससीए ओव्हल मैदानावर अरुणाचल प्रदेशविरुद्ध खेळताना अवघ्या 84 चेंडूंमध्ये 190 धावांची तुफानी खेळी साकारत त्याने क्रिकेट चाहत्यांना थक्क केले.
या सामन्यात वैभवने केवळ 36 चेंडूंमध्ये शतक झळकावले. त्यानंतर तो वेगाने द्विशतकाकडे वाटचाल करत होता. मात्र स्पिनर तेची नेरीच्या चेंडूवर दोरियाने त्याचा झेल घेतला आणि अवघ्या 10 धावांनी वैभवचे द्विशतक हुकले. तरीही 16 चौकार आणि 15 षटकारांनी सजलेल्या या खेळीने वैभवने एबी डिव्हिलियर्स, जोस बटलर आणि बाबर आजम यांसारख्या दिग्गजांचे विक्रम मोडीत काढले.
14 वर्षे 272 दिवस या अल्पवयात वैभव सूर्यवंशीने लिस्ट-ए क्रिकेटमधील सर्वात जलद शतकाचा विक्रम आपल्या नावावर केला. याआधी हा विक्रम भारताच्या अंबाती रायुडू आणि पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आजम यांच्याकडे होता. एवढेच नव्हे, तर लिस्ट-ए क्रिकेटमध्ये सर्वात जलद 150 धावा करण्याचा विक्रमही त्याने मोडला. अवघ्या 59 चेंडूंमध्ये 150 धावा करत त्याने एबी डिव्हिलियर्स (64 चेंडू) आणि जोस बटलर (65 चेंडू) यांना मागे टाकले.
2025 हे वर्ष वैभव सूर्यवंशीसाठी सुवर्णाक्षरांनी लिहिले जाणारे ठरले आहे. अवघ्या 13 वर्षांच्या वयात आयपीएल लिलावात निवड होणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरला. राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्याने गुजरात टायटन्सविरुद्ध 38 चेंडूंमध्ये 101 धावांची खेळी करत आयपीएलमधील सर्वात कमी वयात शतक करणारा फलंदाज होण्याचा मान मिळवला. त्या हंगामात सात सामन्यांत 206.55 च्या स्ट्राइक रेटने 252 धावा केल्या.
Comments are closed.