लक्ष्मी ऑर्गेनिक कंपनीने सर्व कायद्याचे, पर्यावरणीय नियमाचे पालन करावे; जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कडक सूचना

लोटे एमआयडीसी येथील लक्ष्मी ऑर्गेनिक इंडस्ट्रीज़ लिमिटेड या कंपनीवरून पर्यावरणासह नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी कंपनी प्रशासनासोबत बैठक घेतली. लक्ष्मी ऑर्गेनिक कंपनीने सर्व कायद्याचे, पर्यावरणीय नियमाचे आणि सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशांचे पालन करावे अशा सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी कंपनीचे प्रकल्प प्रमुख दिपक पाटील यांना दिल्या आहेत.
लोटे एमआयडीसी येथील लक्ष्मी ऑर्गेनिक इंडस्ट्रीज़ लिमिटेड कंपनीवरून कोकणात रान पेटले आहे. सोशल मिडिया बरोबर वृत्तपत्र आणि माध्यमातून बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी लक्ष्मी ऑर्गेनिक इंडस्ट्रीज़ लिमिटेडचे प्रकल्प प्रमुख दिपक पाटील यांच्या सोबत एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीत सोशल मिडियावर व्यक्त होत असलेली चिंता, कायदेशीर कामकाजाची आवश्यकता,वैधानिक परवानग्याचे पालन आणि जनतेशी पारदर्शक संवाद याविषयावर चर्चा करण्यात आली.

Comments are closed.