Vastu Tips: घरातील फर्निचर संबंधित वास्तुशास्त्राचे ‘हे’ नियम महत्त्वाचे
घर हे फक्त चार भिंतींचं ठिकाण नसतं, तर ते ऊर्जा, शांतता आणि आनंदाचं केंद्र असतं. योग्य वास्तू पद्धतींचं पालन केल्यास घरातील वातावरण अधिक सकारात्मक होतं आणि दैनंदिन जीवनात समतोल जाणवतो. वास्तुशास्त्रात घरासंबंधी काही नियम सांगण्यात आले आहेत. पूर्वी बैठक, लाकडाच्या वस्तू घरात असायच्या आता त्याची जागा सोफा, टेबल इत्यादी फर्निचरने घेतली आहे. वास्तुशास्त्रानुसार, घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूचा, विशेषतः फर्निचरचा घरातील सदस्यांच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यावर मोठा परिणाम होतो. त्यामुळे फर्निचर संबंधित वास्तुशास्त्राचे काही नियम तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ( Furniture Vastu for Home )
लाकूड
वास्तुशास्त्रानुसार फर्निचरसाठी नेहमी सागवान, शिसम, कडुनिंब किंवा अशोकाचे लाकूड वापरावे. हे लाकूड सकारात्मक ऊर्जा देणारे मानले जाते. घरात लोखंड किंवा प्लास्टिकपासून बनवलेले फर्निचर ठेवल्याने नकारात्मक उर्जा निर्माण होते.
दिशा
सोफा सेट, कपाट किंवा जड शोकेस नेहमी घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवावे. यामुळे घरामध्ये स्थिरता येते. तर हलके फर्निचर जसे की खुर्च्या किंवा लहान टेबल उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवावे. यामुळे सभोवती शांती कायम राहते तसेच प्रगती देखील होते.
आकार
घरातील फर्निचर नेहमी चौकोनी किंवा आयताकृती असावे. गोल, अंडाकृती किंवा त्रिकोणी आकाराचे फर्निचर घरामध्ये तणावास कारणीभूत ठरू शकतं. तसेच फर्निचरचे कोपरे जास्त तीक्ष्ण नसावे; ते गोलाकार असल्यास शुभ परिणाम मिळतात.
हेही वाचा: Vastu Tips: चुकीच्या दिशेला ठेवू नयेत मौल्यवान वस्तू, घरात वाढतात आर्थिक अडचणी
रंग
रंगांचा आपल्या मनावर खोलवर परिणाम होतो. वास्तुशास्त्रानुसार फर्निचरचा रंग हलका आणि डोळ्यांना सुखावणारा असावा. गडद काळा किंवा गडद निळा रंग फर्निचरसाठी वापरणे टाळावे, कारण हे रंग नकारात्मकता आकर्षित करतात. क्रिम, हलका तपकिरी, चॉकलेटी किंवा पांढरा रंग फर्निचरसाठी सर्वोत्तम मानला जातो.
हेही महत्त्वाचं:
- वास्तुशास्त्रानुसार घरात तुटलेले किंवा खराब झालेले फर्निचर ठेवणे अत्यंत अशुभ मानले जाते.
- फर्निचरवर सिंह, वाघ, घुबड असे प्राणी किंवा युद्धाचे प्रसंग कोरलेले नसावेत. त्याऐवजी फुले, वेली किंवा स्वस्तिक यांसारखी शुभ चिन्हे असल्यास घरात आनंदी वातावरण राहते.
- कपाट नेहमी उत्तर दिशेला तोंड करून ठेवावं. उत्तर ही कुबेराची दिशा मानली जाते, ज्यामुळे धनवृद्धी होते.
- डायनिंग टेबल घराच्या वायव्य कोपऱ्यात किंवा स्वयंपाकघरात असणे शुभ ठरते.
Disclaimer: येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. ‘Tezzbuzz.com’ आणि ‘Only मानिनी’ त्याची हमी देत नाही.
Comments are closed.