मुंबईचा महापौर मराठीच, तोही ठाकरे बंधूंचाच! राज ठाकरे यांचा आवाज

शिवसेना-मनसे युतीची घोषणा करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोधकांना खणखणीत आवाज दिला. ‘मुंबईचा महापौर मराठीच होणार, तोही आमचाच, ठाकरे बंधूंचाच होणार,’ असे त्यांनी ठणकावले.

‘कुठल्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे असे मी एका मुलाखतीत म्हणालो होतो. त्या वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली. त्यानंतर बरेच दिवस महाराष्ट्राला शिवसेना-मनसेच्या युतीची प्रतीक्षा होती. ती युती आज झाली आहे,’ असे राज ठाकरे म्हणाले. ‘दोन्ही पक्षांकडून जे कोणी निवडणुका लढवणार आहेत त्यांना उमेदवारी दिली जाईल. हे उमेदवारी अर्ज कधी भरायचे तेही सर्वांना कळवले जाईल,’ असेही त्यांनी सांगितले. मनसे सोडून गेलेल्यांना पुन्हा पक्षात घेणार का असे विचारले असता ‘ते येऊ तर दे. जर-तरची चर्चा कशाला,’ असा सवालही त्यांनी केला. ‘कोण किती जागा लढवणार, आकडा काय हे सांगणार नाही,’ असे सांगतानाच, ‘मुंबई, महाराष्ट्र आणि मराठी माणसावर ज्यांचे प्रेम आहे अशा पत्रकारांनी युतीच्या मागे उभे राहावे, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.

फडणवीस अल्ला हाफीज म्हणाले होते… माझ्याकडे भाजपवाल्यांचे खूप व्हिडीओ!

शिवसेना-मनसेला मत म्हणजे मुस्लिमधार्जिण्या राजकारणाला मत, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यावरही राज ठाकरे यांनी उत्तर दिले. ‘मुख्यमंत्री फडणवीस यांचाही एक व्हिडीओ सध्या फिरतो आहे, त्यात ते ‘अल्ला हाफीज’ असे म्हटले आहेत. त्यामुळे या गोष्टी त्यांनी सांगू नयेत. माझ्याकडे खूप व्हिडीओ आहेत,’ असा सूचक इशाराच त्यांनी दिला. ते व्हिडीओ दाखवणार का, असे पत्रकारांनी विचारताच, ‘ते काय बोलतात, त्यानुसार माझे व्हिडीओ बाहेर काढेन,’ असे राज ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्रात सध्या लहान मुले पळवणाऱ्या खूप टोळ्या फिरत आहेत. त्यांच्यात आणखी दोन टोळय़ांची भर पडली आहे. या टोळ्या राजकीय पक्षांमधील मुले पळवतात!

उत्तरं देवांना द्यावीत, दानवांना नव्हे!

‘उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची ही शेवटची निवडणूक आहे. या निवडणुकीनंतर त्यांच्यासोबत कार्यकर्ते राहणार नाहीत, असे म्हणत, भाजपचे माजी खासदार रावसाहेब दानवे यांनी शिवसेना-मनसे युतीवर टीका केली होती. त्यांच्या या टीकेचा उद्धव ठाकरे व राज ठाकरे दोघांनीही जोरदार समाचार घेतला. ‘दानवेंवर प्रतिक्रिया देण्याच्या पातळीचे ते राहिलेले नाहीत. त्यांना त्यांच्या पक्षातही कोणी विचारत नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सुनावले, तर ‘उत्तरं देवांना द्यावीत, दानवांना नाही,’ असा सणसणीत टोला राज ठाकरे यांनी हाणला.

Comments are closed.