अखेर ठाकरे गट आणि मनसे यांच्यात युती झाली.

राज ठाकरे यांनी केली घोषणा : जागावाटप  गुलदस्त्यात : महापालिका निवडणुकीत एकत्र काम करणार

प्रतिनिधी/ मुंबई

मराठी भाषेसाठी जुलै 2025 मध्ये काढण्यात आलेल्या मार्चात सहभागी झाल्यापासून युती होण्याची प्रतीक्षा असलेल्या उद्धव आणि राज ठाकरे बंधूंच्या पक्षांची बुधवारी राजकीय युती जाहीर करण्यात आली. राज ठाकरे यांनीच ही घोषणा केली. मुंबई तसेच नाशिक महापालिकांसाठी ही युती आहे. पुढे सर्वच महापालिकांसाठी युती होईल, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

वरळी येथे हॉटेल ‘ब्लू सी’मध्ये पत्रकार परिषदेत युतीची घोषणा करण्यापूर्वी राज व उद्धव ठाकरे यांनी एकाच गाडीतून बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर जाऊन त्यांना अभिवादन केले. दोन्ही बंधूंनंतर रश्मी ठाकरे व शर्मिला ठाकरे तसेच आदित्य ठाकरे व अमित ठाकरे यांनीही पुष्पहार अर्पण करून बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली. त्यावेळी हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

महाराष्ट्र ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होता, ती ‘ठाकरे युती’ आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी घोषित केली. 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र आले. ‘महाराष्ट्रापेक्षा मोठे काही नाही’ हा संदेश देत त्यांनी या युतीचे महत्त्व स्पष्ट केले. राज ठाकरे यांनी युतीची घोषणा करताच टाळ्यांचा क़डकडाट झाला. मात्र युती जाहीर केली तरी दोन्ही पक्षांतर्फे जागावाटपाची घोषणा झालेली नाही. जागावाटप अद्याप घोषित करणार नाही, असेही राज ठाकरे म्हणाले.

जे काही बोलायचे ते येत्या काळात बोलणार

आम्हाला जे काही बोलायचे आहे, ते आम्ही येत्या काळात जाहीर सभांमध्ये बोलणार आहोत. सध्या मात्र युती झाली हेच सांगण्यासाठी जमलो आहोत.  कोणत्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे हे मी आधीही बोललो होतो. तेथूनच एकत्र येण्याची सुरुवात झाली. आमचे दोन्ही पक्ष, कोण किती जागा लढवणार, कुठे लढवणार, आकडा काय हे सगळे आम्ही तुम्हाला सांगणार नाही, असे राज ठाकरे म्हणाले.

मुख्य भर मुंबईवर

मुंबईवर अधिकार ठाकरे यांचाच आहे. असंख्य कार्यकर्ते हेच त्यांचे बळ, असे उद्धव ठाकरे एका सभेत म्हणाले होते. आता दोन्हा ठाकरे एकत्र आल्याने त्यांच्या विधानाला जोर आला आहे. ठाकरे बंधूंमधील जागावाटप चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे समजते. शिवसेना ठाकरे गट 145 ते 150 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना 65 ते 70 जागा, इतर मित्रपक्ष 10 ते 12 जागांवर लढणार असल्याची माहिती समोर आली आहे.

महापौर मराठीच होणार

मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार, असे त्यांनी मोठे विधान करत महापालिका निवडणुकीत ताकदीने उतरणार असल्याचेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

एकत्र राहण्यासाठीच एकत्र : उद्धव ठाकरे

मुंबईच नाही तर 29 महापालिका निवडणुका एकत्र लढवल्या जातील. एकत्र आलोय आणि एकत्र राहणार असल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांनी फक्त मराठी माणसासाठी एकत्र आल्याचे त्यांनी म्हटले. मुंबई महापालिकेसाठी रणसंग्रामाला ख्रया अर्थाने आजपासून सुरुवात झाली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. जागा वाटपाचे पत्ते न उलगडता दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केली. मुंबई महापालिकेत एकत्रित लढण्याचा निर्णय या निमित्ताने त्यांनी जाहीर केला. त्याचवेळी दोघांनी भाजपवर निशाणा साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मराठी माणसांना मनसे-शिवसेनेच्या पाठीशी राहण्याचे आवाहन केले.

भगवा फडकणे निश्चित

युतीबाबत प्रास्ताविक करताना खासदार संजय राऊत भावूक झाले. आजचा दिवस सुवर्णअक्षरांनी लिहिला जाईल. संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश ज्याप्रमाणे महाराष्ट्रात आला, तसाच आज मराठी ऐक्याचा हा मंगल कलश उद्धव आणि राज यांच्या रूपाने आला आहे. महाराष्ट्राला केवळ ठाकरेच नेतृत्व देऊ शकतात आणि आजच्या या युतीमुळे मुंबईसह सर्व महापालिकांवर भगवा फडकणे आता निश्चित आहे, असे संजय राऊत म्हणाले.

विरोधकांसमोर मोठे आव्हान

दरम्यान उद्धव-राज यांच्या युतीच्या घोषणेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. विशेषत: मुंबई, ठाणे आणि नाशिक यांसारख्या शहरांतील महानगरपालिका निवडणुकांमध्ये या युतीचा मोठा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. ठाकरे बंधूंच्या या एकत्र येण्यामुळे विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

लाव रे तो व्हिडिओ

ठाकरे-मनसे युतीसंदर्भात फिरणाऱ्या एका व्हिडिओसंदर्भात राज ठाकरे म्हणाले की, माझ्याकडे खूप व्हिडीओ आहेत. ते काय बोलतील त्यावर मी व्हिडीओ लावणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला. फक्त हेच नाही तर मुख्यमंत्र्यांचे खूप सारे व्हिडीओ आपल्याकडे असल्याचा दावा त्यांनी केला.

दोन शून्य एकत्र आले तरी बेरीज शून्यच : देवेंद्र फडणवीस

राज आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीमुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची गणिते बदलणार आहेत, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत निश्चिंत आहेत. त्यांनी या युतीवर बोचरी टीका केली आहे. राजकारणात जेव्हा दोन शून्य एकत्र येतात, तेव्हा त्यांची बेरीजही शून्यच राहते. मुंबईकरांना आता शहर गाजवणारे नको, तर प्रामाणिकपणे सेवा करणारे सेवेकरी हवेत, अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे बंधू युतीवर टीका केली.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले की, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत, याचा मला आनंद आहे. पण ते एकत्र आल्याने राजकीयदृष्ट्या फार काहीतरी घडेल असा जर कुणाचा समज असेल तर तो बाळबोध समज आहे. काही माध्यमे असे दाखवत होती की, रशिया आणि युक्रेनचीच युती होते आहे. झेलेन्स्की निघाले, पुतिन निघाले आणि युती झाली. मला वाटते कुठल्याही पक्षाला अस्तित्व टिकवण्यासाठी जे करायचे असते ते त्यांनी केले. याने काही फार परिणाम होईल असे वाटत नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Comments are closed.