RCBचा वेगवान गोलंदाज जाणार तुरुंगात?, लैंगिक शोषण प्रकरणात कोर्टाने यश दयालची बेल फेटाळली

यश दयाल जामीन फेटाळला जयपूर कोर्ट बातम्या : भारतीय क्रिकेटमधील उदयोन्मुख स्टार आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाचा डावखुरा वेगवान गोलंदाज यश दयालच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. जयपूरच्या पॉक्सो न्यायालयाने 24 डिसेंबर 2025 रोजी त्याचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळला आहे. अल्पवयीन मुलीशी संबंधित लैंगिक शोषण आणि बलात्काराच्या गंभीर आरोपांप्रकरणी पोलिसांनी यश दयालविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

यश दयालला होणार अटक?

जयपूर महानगर प्रथम येथील पॉक्सो कोर्ट क्रमांक-3 च्या न्यायमूर्ती अलका बन्सल यांनी निकाल देताना स्पष्टपणे सांगितले की, आतापर्यंतच्या तपासात उपलब्ध पुराव्यांवरून आरोपीला खोट्या प्रकरणात अडकवले असल्याचे दिसून येत नाही. तपासात आरोपीची भूमिका समोर आली असून त्याची सखोल चौकशी अजून बाकी आहे. मात्र, यश दयालसाठी सर्व मार्ग बंद झालेले नाहीत. त्याच्याकडे उच्च न्यायालयात दाद मागण्याचा पर्याय अजून खुला आहे. दरम्यान, या प्रकरणात अडकल्यापासून तो क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे.

जुलै 2025 मध्ये दाखल झाला होता गुन्हा

23 जुलै 2025 रोजी जयपूरच्या सांगानेर सदर पोलीस ठाण्यात एका 19 वर्षीय तरुणीने यश दयालविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. तक्रारदार तरुणी स्वतःला एक उदयोन्मुख क्रिकेटपटू असल्याचे सांगते. तिचा दावा आहे की, 2023 मध्ये तिची यश दयालशी ओळख झाली, तेव्हा ती अवघी 17 वर्षांची अल्पवयीन होती.

पीडितेच्या आरोपानुसार, लग्नाचे आमिष दाखवून यशने तिचे भावनिक आणि शारीरिक शोषण केले. पहिली घटना 2023 मध्ये घडली, जेव्हा यशने तिला जयपूरमधील सितापुरा परिसरातील एका हॉटेलमध्ये बोलावून अत्याचार केला, असा आरोप आहे. हा प्रकार जवळपास दोन वर्षे सुरू होता, असेही तिने म्हटले आहे.

आरोप खोटे असल्याचा दयालचा दावा

सुनावणीदरम्यान यश दयालच्या वकिलांनी आरोप पूर्णपणे खोटे असल्याचे सांगितले. बचाव पक्षाने असा दावा केला की, दोघांमधील संबंध परस्पर संमतीने होते. तसेच, यश दयाल एक प्रतिष्ठित व्यावसायिक क्रिकेटपटू असून तो तपासात पूर्ण सहकार्य करण्यास तयार असल्याचेही न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.

वादात असूनही RCBचा यश दयालवर विश्वास

या गंभीर प्रकरणात अडकल्यानंतरही आरसीबी संघाने यश दयालवर विश्वास दाखवला आहे. आयपीएल 2024 पूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्याला 5 कोटी रुपयांना संघात घेतले होते. मागील हंगामात त्याने संघाच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याच कामगिरीच्या जोरावर आयपीएल 2026 साठीही आरसीबीने यश दयालला रिटेन केले आहे.

हे ही वाचा –

Vijay Hazare Trophy News : विजय हजारे ट्रॉफीचा पहिला सामना गाजवला, रोहित-विराटचं शतक; आता दुसरा सामना कधी अन् कुठे रंगणार, Live स्ट्रिमिंग होणार?, जाणून घ्या A टू Z माहिती

आणखी वाचा

Comments are closed.