सार्वजनिक निधीचा गैरवापर प्रकरण सत्र न्यायालयाच्या निकालाला स्थगिती द्या! आमदार कुडाळकरांची हायकोर्टात धाव

म्हाडाच्या आरक्षित भूखंडांवर सभागृह आणि व्यावसायिक संकुल बांधल्याप्रकरणी अडचणीत आलेले शिंदे गटाचे आमदार मंगेश कुडाळकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. एफआयआर नोंदवण्याच्या सत्र न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी करत आमदार कुडाळकर यांनी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर हायकोर्टात 14 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे.
आमदार कुडाळकर यांच्यावर सार्वजनिक निधीचा गैरवापर केल्याचा आरोप असून हे आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी झालीच पाहिजे असे निरीक्षण नोंदवत अतिरिक्त न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी मंगेश कुडाळकर यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याचे नेहरू नगर पोलीस ठाणे व एसीबीला आदेश दिले आहेत. या आदेशाला आमदार कुडाळकर यांनी हायकोर्टात आव्हान दिले असून आदेशाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. त्या याचिकेवर आज बुधवारी न्यायमूर्ती आर.एन. लड्डा यांच्या एकलपीठासमोर सुनावणी होती. मात्र वेळेअभावी ही सुनावणी आज होऊ शकली नाही.

Comments are closed.