मोठी बातमी : विवाहितेवर अत्याचार, कुशीत झोपलेल्या चिमुकल्याची हत्या, नराधमाला फाशी, महाराष्ट्रा

गडचिरोली : विवाहित महिलेवर अत्याचार करताना तिच्या कुशीत झोपलेल्या अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकल्याचा गळा दाबून निर्घृण हत्या करणाऱ्या नराधमाला अखेर फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अहेरी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रकाश आर. कदम यांनी बुधवारी हा ऐतिहासिक निकाल दिला. तब्बल सात वर्षांनंतर या अमानुष गुन्ह्याचा निकाल लागल्याने पीडित कुटुंबाला काहीसा न्याय मिळाला आहे.

2017 मध्ये घडली होती धक्कादायक घटना

ही धक्कादायक घटना गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यातील कांचनपूर गावात जून 2017 मध्ये घडली होती. पीडित महिला पती आणि तीन वर्षांच्या मुलासोबत राहत होती. रोजगारासाठी पती आंध्र प्रदेशात गेल्यानंतर घरात केवळ आई आणि चिमुकला मुलगा असतानाच शेजारी राहणाऱ्या संजू विश्वनाथ सरकार याने मध्यरात्री घरात घुसखोरी केली. त्यानंतर विवाहितेवर अत्याचार करताना तिच्या कुशीत झोपलेल्या चिमुकल्याचा गळा दाबून खून केला.

संतप्त गावकऱ्यांनी जाळले होते आरोपीचे घर

या अमानुष घटनेनंतर त्यावेळी संतप्त गावकऱ्यांनी आरोपी संजू विश्वनाथ सरकारचे घर जाळले होते. जीवाच्या भीतीने आरोपीच्या कुटुंबाने गाव सोडून आष्टी येथे बस्तान मांडले. त्यांच्या कुटुंबात आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. संजू सरकार हा तब्बल आठ वर्षे तुरुंगात होता. गुन्हा केला तेव्हा तो 22 वर्षांचा होता. त्याचा विवाह झालेला नव्हता. त्या घटनेनंतर  8 महिन्यांपूर्वी त्याची जामिनावर सुटका झाली, आष्टी येथे तो एका गॅरेजमध्ये मेकॅनिक म्हणून काम करायचा आणि तुरुंगातून बाहेर आल्यावर त्याने विवाह देखील केला होता.

परिस्थितीजन्य पुरावे ठरले महत्त्वाचे…

या प्रकरणी अहेरी ठाण्यात कलम 302, 376, 307 व 450 भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन उपनिरीक्षक संतोष वामे यांनी तपास करून पुढील तपास उपअधीक्षक गजानन टोम्पे यांनी केला. ठोस साक्षी, वैद्यकीय अहवाल आणि परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे सरकारी पक्षाने आरोपीचा गुन्हा सिद्ध केला.

कलम 302 अंतर्गत फाशीची शिक्षा

या प्रकरणात सरकारी पक्षाने सादर केलेले ठोस पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि वैद्यकीय अहवाल ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपी संजू विश्वनाथ सरकार (रा. कांचनपूर, ता. मुलचेरा) याला भारतीय दंड संहिता कलम 302 अंतर्गत फाशीची शिक्षा सुनावली. तसेच बलात्कार व खुनाचा प्रयत्न या गुन्ह्यांखाली जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. यासोबतच पीडित महिलेला विधिसेवा प्राधिकरणामार्फत आर्थिक मदत देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

हे ही वाचा –

Nanded News: नांदेडमध्ये एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू, दोन मुलांनी रेल्वेखाली उडी मारली, आई-वडिलही घरात मृतावस्थेत आढळले, घटनेनं पोलीसही चक्रावले

आणखी वाचा

Comments are closed.