दारू प्यायल्यामुळे तोंडाचा कर्करोगाचा धोका अधिक, रोजचा एक पेगही सुरक्षित नाही

दारू प्यायल्यामुळे तोंडाच्या (ओरल कॅव्हिटी) कर्करोगाचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो, विशेषत: स्थानिकरीत्या तयार होणारी दारू पिणाऱ्यांमध्ये हा धोका जास्त असल्याचे अ‍ॅडव्हान्स्ड सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर (ACTREC) यांनी केलेल्या बहुकेंद्र अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. या मोठ्या प्रमाणावर झालेल्या संशोधनात दारू पिणाऱ्यांना न पिणाऱ्यांच्या तुलनेत तोंडाच्या कर्करोगाचा धोका 68 टक्क्यांनी अधिक असल्याचे निष्पन्न झाले. दिवसाला नऊ ग्रॅमपेक्षा अधिक दारू पिणाऱ्यांमध्ये हा धोका 81 टक्क्यांपर्यंत वाढल्याचेही आढळले. हिंदुस्थान टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे.

स्थानिकरीत्या बनविलेल्या ‘थर्रा’, ‘देशी दारू’, ‘महुआ’ यांसारखी दारू पिणाऱ्यांमध्ये सर्वाधिक धोका आढळला. तोंडाच्या कर्करोगासंदर्भात दारू आणि तंबाखू एकत्र वापरल्यास हा धोका आणखी वाढत असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. बीएमजे ग्लोबल हेल्थ या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या या संशोधनात ACTREC सहित टाटा मेमोरियल सेंटरच्या विविध रुग्णालयांमधील 3,706 पुरुषांचा डेटा विश्लेषित करण्यात आला. यात 1,803 रुग्णांमध्ये बक्कल म्यूकोसा कर्करोग निदान झालेला होता, तर 1,903 पुरुषांना कर्करोग नव्हता. 2010 ते 2021 दरम्यान या रुग्णांचे नमुने संकलित करण्यात आले.

हिंदुस्थानमध्ये दरवर्षी जवळपास चार लाख नवीन तोंडाच्या कर्करोगाचे रुग्ण आढळतात आणि त्यापैकी मोठे प्रमाण पुरुषांचे आहे. पुरुषांमध्ये दर एक लाखांमागे सुमारे 15 आणि महिलांमध्ये पाच जणांना तोंडाचा कर्करोग होतो. उशिरा निदान आणि उपचारांमध्ये होणारा विलंब यामुळे पाच वर्षांनंतर केवळ 40 टक्क्यांपेक्षा कमी रुग्ण वाचतात, असेही संशोधनात नमूद आहे.

या अभ्यासाचा महत्त्वाचा निष्कर्ष असा की तोंडाच्या कर्करोगाच्या जोखमीसंदर्भात दारू पिण्यासाठी कोणतीही “सुरक्षित मर्यादा” नाही. दिवसाला नऊ ग्रॅमपेक्षा कमी दारू प्यायल्यानंतरही धोका वाढलेला दिसतो. “थोडी दारू चालते असा समज चुकीचा आहे. कोणतेही प्रमाण म्हणजे धोका,” असे ACTRECच्या कॅन्सर एपिडेमिऑलॉजी केंद्राचे संचालक डॉ. राजेश दिक्षीत यांनी स्पष्ट केले.

संशोधकांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्य 11 प्रकारच्या मद्यांचे आणि 30 प्रकारच्या स्थानिक दारूंचे सेवन करणाऱ्यांचा अभ्यास केला. सर्व प्रकारच्या दारूमुळे धोका वाढत असला तरी स्थानिक, अनियंत्रित दारूमुळे सर्वाधिक धोका असल्याचे दिसून आले. ‘थर्रा’ पिणाऱ्यांमध्ये तोंडाच्या कर्करोगाचा धोका तीनपट अधिक होता, तर ‘देशी दारू’ आणि ‘महुआ’ यांमुळेही धोका मोठ्या प्रमाणात वाढल्याचे आढळले.

ACTRECच्या वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. शरयू म्हात्रे यांनी सांगितले की, दिवसाला एकच पेय घेतले तरी तोंडाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. दारू आणि तंबाखू हे टाळता येणारे जोखीम घटक आहेत आणि दोन्हीपासून दूर राहिल्यास रोगाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते.

ACTRECचे संचालक डॉ. पंकज चतुर्वेदी यांनी सांगितले की, हिंदुस्थानमध्ये तातडीने सर्वसमावेशक दारू नियंत्रण धोरणाची गरज आहे. दारूचे ग्लॅमरायझेशन सुरू असताना स्थानिक अनियंत्रित दारू सहज उपलब्ध आहे. दारू आणि तंबाखू नियंत्रण धोरणे मजबूत केल्यास पुढील दशकात तोंडाच्या कर्करोगाचे अनेक रुग्ण वाचू शकतात.

Comments are closed.