रवि शास्त्री इंग्लंडचे नवे प्रशिक्षक बनणार? अ‍ॅशेस पराभवानंतर इंग्लंडच्या दिग्गजाची मोठी शिफारस

ऑस्ट्रेलियातील आणखी एका निराशाजनक अ‍ॅशेस दौऱ्यानंतर इंग्लंड क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅकुलम यांच्यावरचा दबाव सातत्याने वाढताना दिसत आहे. अ‍ॅशेस मालिकेत अवघ्या 11 दिवसांत इंग्लंडने मालिका गमावली असून, दोन कसोटी सामने शिल्लक असताना संघ 0-3 असा पिछाडीवर आहे. या अपयशानंतर इंग्लंडच्या नेतृत्व आणि कोचिंग सेटअपवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

इंग्लंडचा माजी फिरकीपटू मोंटी पनेसरने मॅकुलम यांच्या जागी भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांची नियुक्ती करण्याचा सल्ला दिला आहे. पनेसरच्या मते, इंग्लंडला अशा प्रशिक्षकाची गरज आहे, ज्याच्याकडे ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरच्या परिस्थितीत हरवण्याची मानसिकता आणि रणनीती दोन्ही आहेत, आणि रवि शास्त्री हा त्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.

पत्रकार रवि बिष्ट यांच्या यूट्यूब चॅनेलवर संवाद साधताना पनेसर म्हणाला, “इंग्लंडला आता टॉप लीडरशिपमध्ये बदल करण्याची गरज आहे. तुम्हाला असा कोच हवा आहे, जो ऑस्ट्रेलियाच्या मानसिक, शारीरिक आणि रणनीतिक कमकुवतपणाचा फायदा कसा घ्यायचा हे जाणतो. ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात हरवण्याचा मार्ग कोणाला माहीत आहे, असा विचार केला तर माझ्या मते रवि शास्त्री हेच योग्य नाव आहे.”

पनेसरचा हा सल्ला केवळ मतावर आधारित नसून, रवि शास्त्री यांच्या दमदार कोचिंग रेकॉर्डवर आधारित आहे. शास्त्री यांच्या कार्यकाळात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात सलग दोन वेळा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकली. 2018-19 मध्ये भारताने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकत इतिहास रचला, तर 2020-21 मध्येही शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने ही कामगिरी पुन्हा करून दाखवली.

दरम्यान, ब्रेंडन मॅकुलम यांची मे 2022 मध्ये इंग्लंडच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळी इंग्लंडला अ‍ॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाकडून 4-0 असा पराभव स्वीकारावा लागला होता. मॅकुलम आणि कर्णधार बेन स्टोक्स यांनी मिळून संघात आक्रमक बदल केले आणि सुरुवातीला त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले. इंग्लंडने त्यांच्या पहिल्या 11 कसोटी सामन्यांपैकी 10 सामने जिंकले. मात्र, त्यानंतर संघाची घसरण झाली असून, पुढील 33 कसोटी सामन्यांपैकी 16 सामन्यांत इंग्लंडला पराभव पत्करावा लागला आहे.

Comments are closed.