मुंबई-गोवा महामार्गावर अपघाताचे ३२ ब्लॅक स्पॉट्स; ठिकठिकाणी खड्डे, चौपदरीकरण रखडले

ठिकठिकाणी पडलेले खड्डे, रखडलेले चौपदरीकरण यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवास नको रे बाबा… अशी म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. महामार्गावर अपघाताचे ३२ ब्लॅक स्पॉट्स असून लाखो प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या १४ वर्षांत ५ हजार ५८ अपघात झाले असून त्यामध्ये १ हजार २२९ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. चौपदरीकरणाचे काम पूर्ण होणार तरी केव्हा, असा प्रश्न रायगडवासीयांना पडला आहे.

पळस्पे ते इंदापूर या ८४ किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्यातील मार्गाचे चौपदरीकरणाचे काम १४ वर्षांपासून रखडले आहे. तसेच इंदापूरपुढील दुसऱ्या टप्प्याच्या कामाचीही तीच गत आहे. महामार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून अनेक भागात खड्डे पडले आहेत. तसेच पर्यायी मार्ग, पुलांची कामे, संरक्षक फलकांचा अभाव या सर्व बाबींमुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात होत असल्याचे दिसून येते. परिणामी महामार्गावर अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. रायगड जिल्ह्यातील पळस्पे ते कशेडी या १५४ किलोमीटर हद्दीतून मुंबई-गोवा महामार्ग जातो. तसेच दररोज सुमारे १ लाख ८५ हजार ९४२ मेट्रिक टन एवढी वाहतूक होते.

हे आहेत डेंजर झोन

खारपाडा पूल, खरोशी फाटा, तरणखोप, रामवाडी, वाशी फाटा, उचेडे, डोलवी, गडब, कासू, आमटेम, पेण फाटा ते अंगार आळी, सुकेळी खिंड, तळवली, पुई, मुगवली, कशेणे, ढालघर, तिलोरे, रेपोली, लोणेरे, टेमपाले, तळेगाव, गोरेगाव बस स्थानकाच्या ५०० मीटरजवळ, लोणेरे बस स्थानकाजवळील २०० मीटरचा परिसर, टेमपाले ते लाखपाले ते पेहेल, गांधारपाले, वीर, वीर फाटा, चोळई, धामणदेवी, लोहारे, पार्ले या ठिकाणांचा समावेश आहे.

Comments are closed.