नवी मुंबई विमानतळाला एसी बस; प्रमुख स्थानकांहून थेट कनेक्टिव्हिटी

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (NMIA) व्यापारी उड्डाणांचा शुभारंभ झाल आहे. विमानतळाशी अखंड व सुसंगत सार्वजनिक वाहतूक उपलब्ध करून देण्यासाठी नवी मुंबई महानगर परिवहन महामंडळ (NMMT) आणि बेस्टच्या चलो बस वातानुकूलित सेवांना सुरुवात झाली आहे. नवी मुंबई आणि मुंबईतील प्रमुख उपनगरी रेल्वे स्थानके तसेच प्रमुख डेपो येथून विमानतळापर्यंत थेट बससेवा उपलब्ध होणार असून प्रवाशांची तसेच विमानतळ कर्मचाऱ्यांची वाहतूक अधिक सुलभ होणार आहे.

मार्गांच्या तपशीलानुसार NMMTने A सिरीजमधील स्वतंत्र एसी बसमार्ग जाहीर केले आहेत. A1 वातानुकूलित मार्गांतर्गत NMIAL CTC बसस्थानक ते खारकोपर रेल्वे स्थानक दरम्यान थेट दोन्ही बाजूंनी सेवा सुरू करण्यात आली आहे. A2 एसी मार्ग तुर्भे डेपो, तारघर रेल्वे स्थानक आणि NMIAL CTC बसस्थानकाला जोडतो, त्यामुळे तुर्भे, तळोजा आणि आसपासच्या वसाहतींना विमानतळाशी सुलभ संपर्क मिळणार आहे.

A3 एसी बस सेवा बेलापूर रेल्वे स्थानकाला NMIAL CTC बसस्थानकाशी जोडते आणि पुढे असुडगाव डेपोपर्यंत विस्तारित आहे. त्यामुळे सीबीडी बेलापूर आणि आसपासच्या नोड्समधील प्रवाशांना लास्ट माईल कनेक्टिव्हिटी उपलब्ध होईल. A4 एसी सेवा नेरुळ रेल्वे स्थानक (पूर्व) ते NMIAL CTC बसस्थानक असा मार्ग कव्हर करते, ज्यामुळे हार्बर लाईनवरील प्रवाशांना विमानतळाशी थेट जोडणी मिळते.

विमानतळावर कार्यरत कर्मचारी तसेच खांदेश्वर परिसरातून प्रवास करणाऱ्यांसाठी A5 वातानुकूलित मार्ग सुरू करण्यात आला आहे. या मार्गात नवी मुंबई विमानतळ स्टाफ पार्किंग ते खांदेश्वर रेल्वे स्थानक अशी बससेवा धावणार असून विमानतळ परिसरातील रेल्वे–रस्ता कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम होते.

मुंबईकडून विमानतळावर जाणाऱ्या दीर्घ पल्ल्याच्या प्रवाशांसाठी बेस्टच्या चलो बस प्रिमियम वातानुकूलित सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. S560 मार्ग मारोल डेपो ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असा असून ही बस नेरुळ–सीवूड्स कॉरिडॉरमार्गे धावणार आहे, त्यामुळे अंधेरी पूर्व व आसपासच्या व्यवसायिक भागांना जोडणी मिळेल. S561 मार्ग वर्ल्ड ट्रेड सेंटरला अटल सेतू मार्गे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडतो आणि दक्षिण मुंबईतील व्यापारी परिसरातून विमानतळाकडे थेट संपर्क उपलब्ध करून देतो.

या नव्या बससेवांमुळे विमानतळ प्रवासी व कर्मचारी यांना आरामदायी, वेळेवर आणि सार्वजनिक वाहतुकीवर आधारित प्रवासाचा सोयीस्कर पर्याय उपलब्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Comments are closed.