उत्पादन वाढणार; यंदा भरपूर आंबे खा! रायगडात थंडीने मोहोर बहरला, २० टक्के जादा पीक हाती येणार

>>प्रणय पाटील

यंदा थंडीने चांगलाच गारठा आणला असून ही थंडी आंब्यांच्या कलमांना फळली आहे. त्यामुळे अलिबागसह रायगड जिल्ह्यातील हापूस, रायवळ, पायरी आंब्यांची कलमे मोहोरांनी बहरून गेली आहेत. आंब्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याने यंदा आंब्याच्या उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ होण्याची शक्यता बागायतदारांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे यंदा खवय्यांना आंब्यावर भरपूर ताव मारता येणार आहे.

रायगड जिल्ह्यात आंबा लागवडीखालील एकूण ४२ हजार हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी १४ हजार ५०० हेक्टर क्षेत्रात आंब्याचे ठोस उत्पादन घेतले जाते. यातून दरवर्षी जवळपास २१ हजार ४२४ मेट्रिक टन एवढे उत्पादन मिळते. यंदा मात्र या उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ अपेक्षित आहे. आंबा उत्पादनासाठी पोषक वातावरण कायम राहिल्याने तसेच कीड रोगाचा फारसा प्रादुर्भाव नसल्याने आंबा उत्पादनात काही प्रमाणात वाढ अपेक्षित असल्याचे सांगितले जात आहे.

मार्चमध्येच पहिली पेटी येईल

दरवर्षी आंब्याला ऑक्टोबर महिन्यात पालवी येण्याची प्रक्रिया सुरू होते. या पालवीला डिसेंबर, जानेवारी महिन्यात मोहोर येतो. यंदा मोहर येण्याची प्रक्रिया वेळेत सुरू झाली आहे. एकून उत्पादनक्षम क्षेत्रापैकी जवळपास ७० टक्के क्षेत्रावर मोहर आला आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत फळधारणेचे प्रमाण समाधानकारक राहणार आहे. लवकर मोहोर आल्याने कोकणातील आंब्याची पहिली पेटी मार्च महिन्यातच वाशीच्या मार्केटमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. तसेच एप्रिल महिन्यापासून कोकणातील आंबा मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल होण्यास सुरुवात होईल. जून महिन्यापर्यंत मुबलक प्रमाणात आंबा बाजारात असेल असा अंदाज बागायतदार वर्तवत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे आतापर्यंत रायगड जिल्ह्यात आंब्यावर फारसा कीड रोगांचा प्रादुर्भाव दिसून आलेला नाही. उत्पादकासाठी हीदेखील समाधानाची बाब आहे.

रायगड जिल्हा आंबा उत्पादन दृष्टीक्षेप
आंबा लागवड एकूण क्षेत्र : ४२ हजार हेक्टर
उत्पादनक्षम क्षेत्र : १४ हजार ५०० हेक्टर
वार्षिक सरासरी उत्पादन २१ हजार ४२४ मेट्रिक टन

आंबा पिकासाठी पोषक वातावरण कायम असल्याने या वर्षी आंबा उत्पादनात वाढ अपेक्षित आहे. सध्या कोकणातील आंबा कलमांना मोहोर येण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे मार्च, एप्रिल महिन्यापासून कोकणातील आंबा मोठ्या प्रमाणात दाखल होण्यास सुरुवात होईल. – संजय मोकल, आंबा बागायतदार

Comments are closed.