विराट कोहली 2027 चा वर्ल्ड कप खेळणार का? प्रशिक्षकांनी दिलं स्पष्ट उत्तर
गेल्या बुधवारी, 24 डिसेंबरला विराट कोहलीने (Virat Kohli) विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Vijay Hajare trophy) अविस्मरणीय पुनरागमन केले. आंध्र प्रदेशविरुद्धच्या सामन्यात त्याने 131 धावांची मॅच-विनिंग खेळी साकारली. या सामन्यात दिल्लीने 299 धावांचे लक्ष्य अवघ्या 38 व्या षटकातच गाठले. विराट सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून, याआधी त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतही 2 शतके आणि एक अर्धशतक झळकावले आहे.
विराट उत्कृष्ट फॉर्ममध्ये असला तरी, एक प्रश्न वारंवार विचारला जात आहे की, विराट 2027 चा एकदिवसीय विश्वचषक खेळणार का? आता विराट कोहलीचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी ‘ANI’ शी बोलताना या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. प्रशिक्षक राजकुमार यांच्या मते, विराट 2027 चा विश्वचषक खेळण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.
न्यूज एजन्सी ANI शी बोलताना प्रशिक्षक राजकुमार शर्मा म्हणाले, तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. शानदार फलंदाजी करून त्याने दिल्लीचा विजय निश्चित केला. त्याने खूप काळानंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे, तरीही त्याने उत्तम कामगिरी करून दाखवली. तो सध्या भारतीय संघातील सर्वात सातत्यपूर्ण कामगिरी करणारा खेळाडू असून विश्वचषकासाठी तो पूर्णपणे सज्ज आहे.
दिल्लीसाठी 131 धावांची खेळी करून विराट कोहलीने त्याच्या लिस्ट-A करिअरमधील 58 वे शतक ठोकले. दिल्लीसाठी खेळताना लिस्ट-A क्रिकेटमधील हे त्याचे 5 वे शतक ठरले. याच सामन्यात विराटने लिस्ट-A क्रिकेटमध्ये 16,000 धावांचा टप्पाही ओलांडला. आता विराटच्या नावावर 330 डावांत 16,130 धावा झाल्या आहेत. भारतात या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या (21,999 धावा) नावावर आहे.
विजय हजारे ट्रॉफीमध्ये विराट कोहली आपला पुढचा सामना 26 डिसेंबरला खेळणार आहे. या दिवशी दिल्लीचा सामना गुजरातशी होईल. हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर खेळवला जाणार असून भारतीय वेळेनुसार सकाळी 9 वाजता सुरू होईल.
Comments are closed.