Health Tips: ऑफिसमध्ये दुपारच्या जेवणानंतर थकवा, आळस जाणवतो? ‘या’ टिप्स करा फॉलो
दुपारच्या जेवणानंतर अनेकांना थकवा आणि आळस जाणवतो. याला फूड कोमा असेही म्हणतात. ऑफिसमध्ये दुपारी झोप आली तर कामात लक्ष लागत नाही. अशावेळी काही सोपे उपाय केल्यास तुम्हाला दुपारच्या जेवणानंतर आळस येणार नाही.
दुपारी तुम्ही कोणत्या प्रकारचे अन्न खाता हेही महत्त्वाचे असते. कधीकधी जास्त कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थांमुळे झोप येते. अशावेळी दुपारी संतुलित आहार घेणे गरजेचे आहे. प्रथिने, फायबरयुक्त पदार्थ आहारात समाविष्ट करा. जेवणानंतर एखादा गुळाचा खडा खाऊ शकता. तसेच ऑफिसमध्ये असल्यावर शक्यतो हलके जेवण घ्या.
दुपारी जेवताना पोटभर न खाता हळूहळू चावून जेवण करा. तसेच जमल्यास जेवताना फळे किंवा चणे खाऊ शकता. यामुळे तुमचे पोट भरलेले राहील आणि ऊर्जा मिळेल.
जेवल्यानंतर चालणे नेहमीच चांगले असते. त्यामुळे ऑफिसमध्ये दुपारी पाच मिनिटे उन्हात वॉक करण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमचे स्नायू सक्रिय होतील. चालल्यामुळे ताजेतवाने वाटेल. व्हिटॅमिन डीमुळे थकवा दूर होण्यास मदत होईल.
शरीराला ऊर्जावान ठेवण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी प्या. यामुळे शरीर दिवसभर हायड्रेट राहील, पोटाच्या अनेक समस्या कमी होतील आणि पचनक्रिया सुधारेल. यामुळे वर्किंग वूमनना जाणवणारा थकवा दूर होईल. व्हिटॅमिन सी समृद्ध असलेले हे पेय तुमच्या त्वचेसाठी देखील फायदेशीर ठरते.
कधीकधी झोपेच्या कमतरतेमुळे थकवा येतो. त्यामुळे तुमच्या झोपेच्या रूटीनकडे लक्ष द्या. ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी दररोज ७ ते ८ तासांची झोप आवश्यक आहे. कमी झोपल्याने तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करणे कठीण होऊ शकते.
Comments are closed.