रोहित-विराटचा विजय हजारे ट्रॉफी सामना का टेलिकास्ट केला नाही? आर अश्विनने आता सांगितले मोठे कारण
24 डिसेंबरपासून विजय हजारे ट्रॉफी 2025-26 ला सुरुवात झाली आहे. पहिल्या फेरीत देशातील अनेक राज्यांनी सहभाग घेतला. यामध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली चर्चेचा विषय ठरले. या दोन्ही खेळाडूंनी या स्पर्धेत आपापल्या राज्याचे प्रतिनिधित्व केले. रोहित मुंबईकडून खेळला, तर विराटने दिल्लीकडून सहभाग घेतला. मात्र, दोघांचेही सामने टेलिकास्ट (थेट प्रक्षेपण) करण्यात आले नाहीत. आता आर अश्विनने हे सामने लाइव्ह टेलिकास्ट न करण्यामागचे कारण सांगितले आहे.
रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या चाहत्यांना त्यांना विजय हजारे ट्रॉफीमध्ये टीव्हीवर खेळताना पाहायचे होते. पण सामने टेलिकास्ट झाले नाहीत. यावर आर अश्विनने आपल्या यूट्यूब चॅनलवर सांगितले की, “प्रत्येक जण रोहित आणि विराटला खेळताना पाहू इच्छितो, हे नक्की आहे. पण आपल्याला हे पाहावे लागेल की, रोहित आणि विराट खेळणार आहेत ही माहिती प्रसारकांना किती लवकर मिळाली. आंतरराष्ट्रीय कॅलेंडर जाहीर होताच देशांतर्गत (डोमेस्टिक) कॅलेंडरही जाहीर केले जाते. एकदा हे ठरले की, बीसीसीआय आणि प्रसारक हे ठरवतात की कोणत्या मैदानातून सामना दाखवणे सोपे आहे आणि कोणत्या सामन्यांचे टीव्हीवर प्रसारण केले जाऊ शकते.”
अश्विनने पुढे स्पष्ट केले की, रोहित शर्मा आणि विराट कोहली सुरुवातीपासून खेळणार हे निश्चित नव्हते. अशा परिस्थितीत अगदी शेवटच्या क्षणी बदला करणे कठीण असते.
रोहित शर्माने सिक्कीमविरुद्ध धडाकेबाज शतकी खेळी केली. त्याने 94 चेंडूत 155 धावा केल्या. रोहितच्या या खेळीत 18 चौकार आणि 9 षटकारांचा समावेश होता. दुसरीकडे, विराट कोहलीने आंध्र प्रदेशविरुद्ध 101 चेंडूत 131 धावांची खेळी केली. त्याने 14 चौकार आणि 3 षटकार लगावले. रोहितने मुंबईला जिंकवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, तर विराटने दिल्लीचा विजय सुकर केला.
Comments are closed.