सचिन तेंडुलकरचा महारेकॉर्ड मोडण्याच्या उंबरठ्यावर विराट कोहली! फक्त 3 शतके ठोकताच रचणार नवा इतिहास

विजय हजारे ट्रॉफी 2025-26 (Vijay Hajare trophy 2025-26) च्या पहिल्याच दिवशी विराट कोहली (Virat Kohli) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दिल्लीकडून खेळताना आंध्र प्रदेशविरुद्ध त्याने 131 धावांची वादळी शतकी खेळी केली. या खेळीमुळे दिल्लीने 4 गडी राखून विजय मिळवला. या शतकासह विराट आता सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) एक मोठा विश्वविक्रम मोडण्याच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. विराटने आणखी 3 शतके झळकावल्यास तो नवा वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करेल.

24 डिसेंबरला आंध्र प्रदेशविरुद्ध विराटने 101 चेंडूत 131 धावा केल्या. हे त्याच्या लिस्ट-ए (List-A) करिअरमधील 58 वे शतक ठरले. लिस्ट-ए क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकण्याच्या बाबतीत विराट सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत सचिन तेंडुलकर 60 शतकांसह पहिल्या क्रमांकावर आहे. विराटने अजून 3 शतके मारली तर तो जगातील सर्वाधिक लिस्ट-ए शतके मारणारा खेळाडू बनेल.

लिस्ट-ए क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके:
सचिन तेंडुलकर: 60 शतके
विराट कोहली: 58 शतके
ग्रॅहम गूच: 44 शतके
ग्रॅमी हिक: ४० शतके
कुमार संगकारा: 39 शतके

बीसीसीआयच्या नियमानुसार, सर्व वरिष्ठ खेळाडूंना देशांतर्गत लिस्ट-ए स्पर्धेत किमान 2 सामने खेळणे अनिवार्य आहे. त्यानुसार विराटचा पुढचा सामना 26 डिसेंबरला गुजरातविरुद्ध होणार आहे.
जर विराटने या स्पर्धेत आणि त्यानंतर जानेवारी 2026 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय (ODI) मालिकेत मिळून एकूण 3 शतके केली, तर तो सचिनचा विक्रम मोडीत काढेल. कारण एकदिवसीय सामने (ODI) हे सुद्धा लिस्ट-ए क्रिकेटचाच भाग मानले जातात.

Comments are closed.