पोलीस अधिकाऱ्याचा त्रास, व्हिडीओ बनवत 20 वर्षाच्या युवकाने जीवन संपवलं; लातूरमधील घटना

लातूर : पोलीस अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून युवकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना लातूर जिल्ह्यातील औराद शाहजनी या गावात घडली. या युवकाने आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडीओ बनवा आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यातून ही बाब समोर आली. इम्रान बेलुरे (वय 20) असं आत्महत्या केलेल्या युवकाचं नाव आहे. या घटनेनंतर युवकाच्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडला.

सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल दूरपडे आणि वाहन चालक तानाजी टेळे यांच्या त्रासाला कंटाळून ही आत्महत्या करत असल्याचं इम्रान बेलुरे याने स्पष्ट केलं. व्हिडीओ बनवल्यानंतर त्याने आत्महत्या केली. सबंधित पोलीस अधिकारी आणि त्याच्या चालकावर कारवाई करावी अशी मागणी मृताच्या नातेवाईकांनी केली.

लातूर तरुणाची आत्महत्या : युवकावर आधीच गुन्हे दाखल

इम्रान बेलुरे याच्यावर चोरी आणि घरफोडीचे दोन गुन्हे दाखल आहेत. त्याच अनुषंगाने पोलीस त्याची चौकशी करत होते. रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने पोलीस सातत्याने त्याचं लोकेशन, त्याची मुव्हमेंट तपासत असल्याचं समोर आलं.

मृताच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, एका वर्षांपूर्वीच्या प्रकरणातून वारंवार घरात येऊन त्रास देणे, घरातील महिलांचा छळ करणे, तसेच मध्यरात्री गाडीत बसवून अज्ञात ठिकाणी नेणे असे प्रकार सुरू होते. 25 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 ते 6 वाजण्याच्या दरम्यान तेरणा नदीकाठच्या झाडीत इम्रानने संबंधितांच्या त्रासामुळे आत्महत्या करत असल्याचा उल्लेख करत व्हिडीओ केला.

Latur Youth Suicide Video : काय म्हटलंय व्हिडीओत?

आत्महत्या करायच्या आधी तयार केलेल्या व्हिडीओमध्ये त्या युवकाने पोलीस अधिकारी त्रास देत असल्याचं सांगितलं. तो म्हणाला की, मला त्या पीएसआयने त्रास दिला. आता सहन होत नाही. माझ्याकडून चोरीचा गु्न्हा झाला, पण माझी ती चूक झाली. मी तसं करायला नको होतं. त्यानंतर मला आणि माझ्या परिवाराला रात्री-अपरात्री त्रास देण्याचं काम सुरू केलं. आता मला सहन होत नाही. त्यामुळे मी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या करतो. याला सर्वस्वी जबाबदार तो पीएसआय आणि त्याचा ड्रायव्हर आहे.

या घटनेनंतर औराद पोलीस ठाण्यात नातेवाईकांसह ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं. संबंधित अधिकाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली. त्यामुळे परिस्थिती काही काळ तणावपूर्ण झाल्याचं दिसून आलं.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा

Comments are closed.