इंडिगोच्या वर्चस्वाला आव्हान असेल.

आणखी तीन विमान कंपन्या भारतात येण्यास सज्ज

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

भारताच्या देशांतर्गत प्रवासी विमान वाहतूक व्यवसायात सध्या ‘इंडिगो’ या कंपनीचे वर्चस्व आहे. या व्यवसायातला 60 टक्के वाटा इंडिगोचा आहे, अशी चर्चा आहे. तथापि, आता या वर्चस्वाला आव्हान मिळण्याची शक्यता आहे. तीन नव्या प्रवासी विमान वाहतूक कंपन्या भारतात येण्यास सज्ज असल्याचे वृत्त आहे.

भारताच्या नागरी विमान वाहतूक विभागाने या कंपन्यांपैकी दोन कंपन्यांना ‘नाआक्षेप प्रमाणपत्र’ दिल्याचीही माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. आणखी एका कंपनीला यापूर्वीच असे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. यामुळे इंडिगोशी स्पर्धा करण्यासाठी आता आणखी तीन कंपन्या सज्ज होत आहेत. त्यांचे नावे ‘फ्लायएक्स्पे्रस’, ‘शंखएअर’ आणि ‘अलहिंद एअर’ अशी असल्याचे समजत आहे.

मंत्र्यांनी दिली माहिती

नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनीही ‘एक्स’वर संदेश प्रसिद्ध करुन ही माहिती दिली आहे. या तीन कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात राममोहन नायडू यांची भेट घेतली आहे. शंख एअर या कंपनीला यापूर्वीच नाआक्षेप प्रमाणपत्र देण्यात आले आहे. तर उरलेल्या दोन कंपन्यांनाही ते बुधवारी देण्यात आले, अशी माहिती नायडू यांनी प्रसिद्ध केली आहे.

भारतात मोठी संधी

भारताचे नागरी विमान वाहतूक क्षेत्र जगातील अन्य कोणत्याही देशापेक्षा अधिक वेगाने विस्तार पावत आहे. त्यामुळे अधिक कंपन्या सामावून घेण्याची या क्षेत्राची क्षमता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने भारताने अशी धोरणे स्वीकारली आहेत, की ज्यांच्यामुळे या क्षेत्राचा अधिक विस्तार होत आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये या क्षेत्राच्या त्यापूर्वीपेक्षा दुपटीहून अधिक विस्तार झाला. पुढच्या पाच वर्षांमध्ये या विस्ताराला वेग अधिकच वाढणार आहे, असे नायडू यांनी स्पष्ट केले.

सध्या तीन कंपन्या कार्यरत

सध्या भारतात नागरी विमान वाहतूक क्षेत्रात तीन कंपन्या प्रामुख्याने कार्यरत आहेत. इंडिगो, एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्पे्रस या त्या तीन कंपन्या आहेत. या तीन कंपन्यांचे 90 टक्के व्यवसायावर वर्चस्व आहे. याखेरीज, अॅलायन्स एअर, आसाका एअर, स्पाईसजेट, स्टार एअर आणि इंडिया एअरवन या कंपन्या भारतात कार्यरत असल्या, तरी त्यांचे कार्यक्षेत्र मर्यादित आहे. तसेच, गेल्या काही वर्षांमध्ये ‘गो फर्स्ट’ आणि ‘जेट एअरवेज’ या कंपन्या आर्थिक दबावामुळे आणि वाढत्या तोट्यामुळे बंद कराव्या लागल्या आहेत. तसे असले, तरी भारतात या क्षेत्रातील वर्धिष्णू संधी पाहून अनेक नव्या कंपन्या प्रवेश करत आहेत.

Comments are closed.