Year Ender 2025 – हिंदुस्थानी क्रीडा विश्वाची महासत्तेकडे वाटचाल, 2025 सालात हिंदुस्थानी खेळाडूंचा बोलबाला

2025 हे वर्ष हिंदुस्थानी क्रीडा इतिहासात फक्त यशाचा हिशेब म्हणून नव्हे तर महासत्तेकडे वाटचाल करणारा टप्पा म्हणून नोंदला जाईल. क्रिकेटमध्ये पुरुष संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी उचलली, महिलांनी पहिला वर्ल्ड कप जिंकून इतिहास रचला; बुद्धिबळात नवी पिढी चमकली, भालाफेकीत नीरजने पुन्हा आकाश चिरलं, खो-खोत पुरुष महिला संघांनी आपल्या खो-खोची ओळख करून दिली आणि पॅरा-स्पोर्ट्सने इच्छाशक्तीची उंची दाखवली. थोडक्यात, 2025 साल म्हणजे हिंदुस्थान आता मैदानावरही नंबर वन होतोय, हे दाखवून दिले.

आशियाई यूथ गेम्स-युवाशक्तीचा जोश

आशियाई यूथ गेम्समध्ये 48 पदकांसह (13 सुवर्ण, 18 रौप्य, 17 कांस्य) हिंदुस्थानची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी. कुस्ती, बॉक्सिंग, अॅथलेटिक्स, कबड्डी, वेटलिफ्टिंग. जिथे नजर जाईल तिथे भविष्य दिसलं. 2026 युथ ऑलिम्पिक्सची दारं उघडली.

तिरंदाजी-पहिल्या सुवर्णबाणाची थेट लागण

जागतिक तिरंदाजी अजिंक्यपदात पुरुष कंपाऊंड संघाने सुवर्ण जिंकत इतिहास घडवला. ऋषभ यादव, प्रभात साळुंखे, पृथ्वमेश फुगे ही नावं लक्षात ठेवा; ही आपली पुढची पिढी आहे.

अॅथलेटिक्स ट्रकवर पदकांचा पाऊस

आशियाई अॅथलेटिक्समध्ये 24 पदकांसह दुसरं स्थान पटकावले. गुलवीर सिंग (5000 व 10,000 मी.), अविनाश साबळे, ज्योती याराजी यांनी वेग, शिस्त आणि सातत्याचं दर्शन घडवले.

नेमबाजी-तरुणाईचा सुवर्णक्षण

20 वर्षीय सम्राट राणाने 10 मीटर एअर पिस्टलमध्ये जागतिक सुवर्ण जिंकत नवं पर्व सुरू केलं. नेमबाजीत हिंदुस्थानचा आत्मविश्वास दुणावला. वर्ल्ड कपच्या इतिहासात हिंदुस्थानने पहिल्यांदाच सोनेरी नेम साधला, हे विशेष.

खो-खो जग बघा

महिला आणि पुरुष खो-खो संघाने वर्ल्ड कप जिंकत पारंपरिक खेळालाही जागतिक व्यासपीठ दिलं. 20 संघांचा सहभाग असलेल्या पहिल्या खो-खो वर्ल्ड कपमध्ये हिंदुस्थानी आपल्या खो-खोचे दर्शन अवघ्या जगाला करुन दिले.

कबड्डीच्या महिलांनीही जग जिंकलं

कबड्डीत हिंदुस्थानची ताकद अभेद्य आहे. महिला संघाने महिलांचा दुसरा वर्ल्ड कपही आपल्याकडेच राखला. चिनी तैपेई संघाने दिलेली लढत जबरदस्त होती, पण हिंदुस्थानच्या महिलांनीही आम्हीही कमी नसल्याचे दाखवून दिले.

महिला क्रिकेट-पहिल्या वर्ल्ड कपचा सुवर्ण अध्याय

नवी मुंबईत पहिला महिला वर्ल्ड कप-हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात आत्मविश्वास, संयम आणि आक्रमकतेचे परिपूर्ण मिश्रण असलेल्या रणरागिणींनी प्रथमच जग जिंकण्याचा इतिहास रचला. हा विजय म्हणजे ट्रॉफीपेक्षा मोठा संदेश होता.

नव्या सम्राटांचा बुद्धिबळ

डी. गुकेशने दिग्गजांवर मात करत जागतिक सन्मान मिळवले; दिव्या देशमुखने फिडे महिला वर्ल्ड कप जिंकत भविष्याची झलक दाखवली. जागतिक बुद्धिबळात हिंदुस्थानच्या नव्या सम्राटांनी आपले कौशल्य दाखवत ‘हम से ना टकराना’ची डरकाळी फोडली.

क्रिकेट-चॅम्पियन्स ट्रॉफीचा जल्लोष

हिंदुस्थानच्या पुरुष संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून आपली वनडतील ताकद पुन्हा सिद्ध केली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानने पुन्हा एकदा भीमपराक्रम केला.

वैयक्तिक व उदयोन्मुख खेळांची व्याप्ती

नीरज चोप्राने भालाफेकीत 90 मीटरचा टप्पा पार केला; तैवान अॅथलेटिक्स ओपनमध्ये टेबल टॉप; वर्ल्ड पॅरा अॅथलेटिक्समध्ये 22 पदकं; स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये 33 पदकं; पिकलबॉलमध्ये डबल गोल्ड; महिला आइस हॉकीत आशियाई कांस्य. क्रीडा विश्वात यत्रतत्र सर्वत्र हिंदुस्थान दिसला. यंदा कामगिरी मोठीही होती आणि उत्साहवर्धकही होती.

दृष्टिबाधित महिला संघ-जागतिक मुकुट

पहिल्यांदाच झालेल्या टी-20 विश्वचषकात हिंदुस्थानी दृष्टिबाधित महिलांचा विश्वविजयी कामगिरी करत प्रेरणेचा नवा अध्याय लिहिला.

मुष्टियुद्ध – मुट्ठी कठोर, मुठी अचुक

जागतिक बॉक्सिंग फायनल्समध्ये 20 पदकं (9 सुवर्ण). जास्मिन लांबोरिया सुवर्णासह चमकली; या स्पर्धेत हिंदुस्थानी बॉक्सिंगची ताकद स्पष्टपणे दिसली.

पॅरा तिरंदाजी-शीतल देवीचा प्रेरणादायी विजय

शीतल देवीने जागतिक किताब जिंकत सिद्ध केले की, सीमा शरीरात नाहीत, विचारांमध्ये असतात. सक्षम स्पर्धांमध्येही तिची वाटचाल सुरू झालीय.

Comments are closed.