महायुतीत जागा आणि वाटपावरून ओढाताण, मुंबई पालिकेत शिंदे गटाला हवंय तीन वर्षे महापौर पद आणि स्थायी समितीचे अध्यक्ष पद
मुंबईसह राज्यातील बहुतांश महानगर पालिकांत महायुती करून लढण्याचा निर्णय भाजप आणि शिंदे गटाने घेतला आहे. त्यासाठी स्थानिक पातळीवर चर्चेच्या प्राथमिक फेऱया पूर्ण झाल्या आहेत. मात्र, कोणाला किती जागा आणि सत्तेतील वाटपावरून ओढाताण सुरू असल्याने महायुतीची घोषणा काहीशी लांबणीवर पडली आहे. मुंबईत शिंदे गटाने 125 जागांबरोबर तीन वर्षे महापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष पदावर दावा केला आहे. तर भाजपने मुंबई, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, वसई-विरार या महानगरपालिकांत आपणच मोठा भाऊ असल्याची भूमिका घेत शिंदे गटाला अधिकचा वाटा देण्यास विरोध केला आहे.
मुंबई पालिकेच्या 227 प्रभागांपैकी 125 जागा मिळाव्यात असा आग्रह शिंदे गटाने धरला. मात्र, भाजपने 150 जागांवर दावा सांगत त्यांची मागणी फेटाळून लावत फार फार तर 70 ते 77 जागा शिंदे गटाला सोडण्याची तयारी दाखवली आहे. 2017 च्या निवडणुकीत कमी फरकाने हरलेल्या जागांवरही भाजपने दावा सांगतानाच शिंदे गटात नसलेल्या नगरसेवकांचे प्रभाग सोडण्यास मुंबई भाजपच्या नेत्यांनी विरोध केला आहे. त्यामुळे आता यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्तरावर निर्णय होणार आहे.
वसई-विरारामध्ये भाजप वरचढ
वसई-विरार पालिकेच्या स्थापनेपासून बहुजन विकास आघाडीचे नेतृत्व आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत पालिकेच्या हद्दीत असणाऱया विधानसभा क्षेत्रात भाजपचे दोन तर शिंदे गटाचा एक आमदार निवडून आला आहे. यामुळे महायुतीच्या जागावाटपात भाजप शिंदे गटाला वरचढ ठरताना दिसत आहे.
ठाण्यात शिंदे गट मोठा भाऊ
ठाणे महानगरपालिकेत स्वबळावर लढण्याची घोषणा स्थानिक भाजप नेत्यांनी केली होती. मात्र, यामुळे राज्यात अन्य ठिकाणी महायुतीत विसंवाद नको म्हणून शिंदे गटाच्या रडारडीनंतर महायुती करून लढण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, ठाण्यात शिंदे गट मोठय़ा भावाच्या भूमिकेत असल्याने सत्तेच्या वाटय़ाचं काय यावरून भाजपमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
नागपूरमध्ये जागांचा मेळ बसेना
नागपुर महापालिकेत महायुती करून लढण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. फडणवीस स्वतः युतीसाठी आग्रही आहेत, मात्र जागांचा मेळ कसा बसवायचा हा प्रश्न भाजपपुढे आहे. महापालिकेच्या 151 जागा असून मागच्यावेळी भाजपचे 108 नगरसेवक होते. शिंदे गटाने 50 जागांची मागणी केली आहे. तर अजित पवार गट 15 ते 20 जागांसाठी आग्रही असल्याने महायुतीचे घोडे अडले आहे.
संभाजीनगरमध्ये जागांवरून काथ्याकुट
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत मोठा भाऊ कोण यावरून भाजप आणि शिंदे गटात जागा वाटपावरून काथ्याकुट सुरू आहे. वरिष्ठांच्या दबावामुळे भाजपच्या स्थानिक नेत्यांनी शिंदे गटासोबत जुळवून घेण्याची तयारी दर्शवली असली तर महायुतीत फरफट होणार नाही याची दक्षता भाजपकडून घेतली जात आहे. शिंदे गटाकडून पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी समोर ठेवला ठेवलेला जागा वाटपाचा प्रस्ताव भाजपला मंजूर नाही. दोन पावले आम्ही मागे आलो आहोत आता दोन पावले त्यांनी मागे यावे, अशी ठाम भूमिका भाजपकडून मंत्री अतुल सावे यांनी घेतली आहे.
नाशिकमध्ये महायुतीत घेण्यासाठी अजितदादा गटाची धडपड
एकेकाळी छगन भुजबळ यांचे वर्चस्व असणाऱया नाशिक महानगरपालिकेत भाजपचा दबदबा वाढला आहे. त्यामुळे भाजपला तशी कुणाचीही गरज राहिलेली नसल्याने महायुतीत घेण्यासाठी अजितदादा गटाची धडपड सुरू आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनंतर शिंदे गटाला सोबत घेण्याची तयारी भाजपने दर्शवली आहे. शिंदे गटाने सुरुवातीला 45 जागांची मागणी केली होती. मात्र, भाजपच्या ताठर भूमिकेनंतर जो प्रस्ताव मोठय़ा भावाच्या भूमिकेत असलेल्या भाजपकडून येईल तो प्रस्ताव मान्य असल्याची भूमिका शिंदे गटाने घेतली आहे.
मुंबई महानगर क्षेत्रात अजित पवार गट एकाकी
महानगरपालिका निवडणुका महायुती एकत्रितपणे लढवेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी अनेकदा स्पष्ट केले आहे. मात्र, महायुतीचा तिसरा घटक पक्ष असलेला अजित पवार गट मुंबई महानगर पालिका क्षेत्रात सध्या तरी एकाकी पडला आहे. मुंबईसाठी बोलणी सुरू असली तर भाजपकडून फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. ठाण्यात शिंदे गट त्यांना सोबत घेण्यास फारसा उत्सुक नाही. नवी मुंबईत अजित पवार गटाचे अस्तित्वच नसल्याचे चित्र आहे. मिरा-भाईंदर, वसई-विरार, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, पनवेल आदी पालिकांत भाजपकडून फारसे महत्त्व दिले जात नसल्याने अजित पवार गटात अस्वस्थता आहे.
ठाणे जिल्ह्यात शिंदे गटाची कोंडी
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कल्याण-डोंबिवलीची लढाई प्रतिष्ठेची करत भाजपचा महापौर बसविण्याचा निर्धार केला आहे. तर मंत्री गणेश नाईक यांनी नवी मुंबईत आपलच वर्चस्व राहावे यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मिरा-भाईंदरमध्ये नरेंद्र मेहता यांनी 65 पेक्षा कमी जागा लढणार नाही, अशी भूमिका घेत मंत्री प्रताप सरनाईक यांची कोंडी केली आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये दोस्तीत कुस्ती
पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपने सुरुवातीला स्वबळाचा नारा दिला होता. मात्र, बदलत्या राजकीय परिस्थितीत अजित पवार गटाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजप आणि शिंदे गट यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. तर भाजपला शह देण्यासाठी अजित पवार गटाने राष्ट्रवादीला सोबत घेऊन लढण्याची तयारी सुरू केली असून येथे दोस्तीत कुस्ती होणार आहे.
Comments are closed.