मध्य रेल्वेकडून खूशखबर! 31 डिसेंबरच्या रात्री विशेष लोकल धावणार

नववर्षाच्या पूर्वसंध्येला कुटुंबीयांसह फिरायला घराबाहेर पडलेल्या प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे चार विशेष लोकल सेवा चालवणार आहे. 31 डिसेंबरच्या मध्यरात्री मेन लाईनवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते कल्याणदरम्यान, तर हार्बर लाईनवर सीएसएमटी ते पनवेलदरम्यान प्रत्येकी दोन लोकल ट्रेन धावणार आहेत. या लोकल सर्व स्थानकांवर थांबणार आहेत.
मध्यरात्री 1.30 वाजता मेन लाईनवर सीएसएमटी येथून लोकल ट्रेन सुटेल. ती गाडी कल्याण येथे पहाटे 3 वाजता पोहोचेल. यादरम्यान कल्याण स्थानकातून मध्यरात्री 1.30 वाजता विशेष लोकल सुटेल आणि ती ट्रेन सीएसएमटी येथे 3 वाजता पोहोचेल. हार्बरवर मध्यरात्री 1.30 वाजता सीएसएमटी येथून पनवेल लोकल सुटेल. याचदरम्यान मध्यरात्री 1.30 वाजता पनवेल येथून सुटणारी विशेष लोकल सीएसएमटी येथे 2 वाजून 50 मिनिटांनी पोहोचणार आहे.
पश्चिम रेल्वेवर आठ लोकल
पश्चिम रेल्वेवर 31 डिसेंबरच्या मध्यरात्री चर्चगेट ते विरारदरम्यान आठ विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत. चर्चगेटहून 1 वाजून 15 मिनिटांनी, 2 वाजता, 2 वाजून 30 मिनिटांनी आणि 3 वाजून 25 मिनिटांनी विरार लोकल रवाना होणार आहे. याचदरम्यान विरार येथून चर्चगेटकडे 4 लोकल धावणार आहेत.

Comments are closed.