रोहित शर्माचा जोडीदार यशस्वी जयस्वाल विजय हजारे ट्रॉफीत कधी करणार एन्ट्री? या दिवशी खेळण्याची शक्यता

सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीमध्ये राजस्थानविरुद्धच्या मुंबईच्या अंतिम सामन्यानंतर टीम इंडियाचा सलामीवीर यशस्वी जयस्वालला गंभीर गॅस्ट्रोएन्टेरिटिसचा त्रास झाल्यानंतर पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामुळे, तो विजय हजारे ट्रॉफी 2025-26 च्या पहिल्या फेरीत सहभागी होऊ शकला नाही. आता, त्याच्यासाठी आनंदाची बातमी येत आहे. तो लवकरच विजय हजारे ट्रॉफीसाठी मुंबई संघात सामील होऊ शकतो. आगामी सामन्यांमध्ये तो पुन्हा एकदा माजी कर्णधार रोहित शर्मासोबत चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसू शकतो.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, भारताचा स्टार सलामीवीर यशस्वी जयस्वाल 29 डिसेंबर रोजी जयपूरमध्ये विजय हजारे ट्रॉफीसाठी मुंबई संघात सामील होईल. जयस्वाल 29 डिसेंबर रोजी छत्तीसगडविरुद्ध मुंबईच्या विजय हजारे ट्रॉफी सामन्यात आणि त्यानंतरच्या सामन्यांमध्ये खेळण्याची अपेक्षा आहे.

भारताचा टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादव आणि अष्टपैलू शिवम दुबे हे देखील 6 आणि 8 जानेवारी रोजी जयपूर येथे होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफीच्या लीग-स्टेज सामन्यांमध्ये मुंबईकडून खेळतील.

जयस्वाल, सूर्या आणि दुबे सारख्या वरिष्ठ खेळाडूंच्या आगमनामुळे मुंबई संघाला लक्षणीयरीत्या बळकटी मिळेल, शिवाय रोहित शर्मा विजय हजारे ट्रॉफीमध्ये किती सामन्यांसाठी उपलब्ध असेल हे पाहणे बाकी आहे. सिक्कीमविरुद्धच्या पहिल्या सामन्यात रोहित शर्माने शानदार शतक झळकावले. ज्यात त्याने 155 धावांची खेळी खेळली. आगामी न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी हिटमॅनने शानदार फाॅर्म मिळवला आहे. न्यूझीलंडविरुद्ध मालिकेला 11 जानेवारी 2026पासून सुरुवात होईल.

Comments are closed.