सोशल मीडियाच्या वापरावर सैनिकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे

भारतीय लष्कराकडून नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतीय लष्कराने आपल्या सैनिक आणि अधिकाऱ्यांसाठी सोशल मीडिया अॅप्सच्या वापराबाबत एक नवीन धोरण जारी केले आहे. नवीन धोरणात इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप, यूट्यूब आणि लिंक्डइन सारख्या प्लॅटफॉर्मच्या वापराबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. त्यात लष्करी कर्मचारी सोशल मीडिया अॅप्स कसे वापरू शकतात हे स्पष्ट केले आहे. इन्स्टाग्राम सारख्या अॅप्सचा वापर आता फक्त माहिती पाहण्यासाठी आणि देखरेख करण्यासाठी केला जाईल. सैनिकांची सुरक्षितता आणि संवेदनशील माहितीचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे लष्करी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

भारतीय लष्कराने जारी केलेल्या गाईडलाईन्सनुसार, जवान इन्स्टाग्रामवर टिप्पणी करू शकणार नाहीत किंवा त्यांचे मत शेअर करू शकत नाहीत. तथापि, स्काईप, व्हॉट्सअॅप, टेलिग्राम आणि सिग्नल सारख्या अॅप्सवर सामान्य आणि संवेदनशील नसलेली माहिती शेअर करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. तथापि, अशी माहिती फक्त ओळखीच्या व्यक्तींसोबत शेअर करता येणार आहे. माहिती पाठवणाऱ्या व्यक्तीची योग्य ओळख पटवण्याची जबाबदारी वापरकर्त्याची असेल. शिवाय, यूट्यूब, एक्स, क्वोरा और इन्स्टाग्राम सारख्या प्लॅटफॉर्मचा वापर फक्त माहिती मिळविणे किंवा शिकण्यासाठी केला जाऊ शकतो. या प्लॅटफॉर्मवर कधीही वैयक्तिक सामग्री अपलोड करता येणार नाही. लिंक्डइनचा वापर फक्त रिज्युम अपलोड करण्यासाठी किंवा नोकरी/कर्मचारी माहिती मिळविण्यासाठी केला जाऊ शकतो.

नवे धोरण का आवश्यक?

शत्रू देशांच्या गुप्तचर संस्था अनेकदा सोशल मीडियाद्वारे हनी ट्रॅप किंवा डेटा माइन करण्याचा प्रयत्न करतात. आता या नवीन लष्करी धोरणाचा उद्देश सैनिकांना डिजिटल धोक्यांपासून संरक्षण करणे आणि शिस्त राखणे असा आहे. उल्लंघनांसाठी शिस्तभंगाची कारवाई देखील केली जाणार आहे. क्लाउड-आधारित स्टोरेज सेवा वापरताना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचा सल्लाही लष्कराने सैनिकांना दिला आहे.

लष्कराच्या नवीन धोरणानुसार…..

► इन्स्टाग्राम, एक्स, यूट्यूब आणि क्वोरा या अॅप्सचा वापर फक्त माहिती गोळा करणे किंवा पाहण्यासाठीच.

► सदर अॅप्सवर टिप्पणी करणे, मते व्यक्त करणे किंवा वैयक्तिक सामग्री अपलोड करण्यास सक्त मनाई आहे.

► व्हॉट्सअॅप, टेलिग्राम, सिग्नल, स्काईपवरून सामान्य स्वरूपाची माहिती/सामग्रीच्या देवाण-घेवाणीस अनुमती

► ही माहिती केवळ वापरकर्ता वैयक्तिकरित्या ओळखत असलेल्या लोकांसह शेअर करू शकणार आहे.

► लष्करी कर्मचारी रिज्युम अपलोड करण्यासाठी किंवा माहिती मिळविण्यासाठी लिंक्डइनचा वापर करू शकतात.

Comments are closed.