लखनौमध्ये राष्ट्रीय प्रेरणा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शानदार कार्यक्रम
वृत्तसंस्था / लखनौ (उत्तर प्रदेश)
उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय ‘राष्ट्रीय प्रेरणास्थळ’ या भव्य स्मारक संकुलाचे उद्घाटन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम गुरुवारी लक्षावधी लोक आणि मान्यवरांचा उपस्थितीत, भारताचे दिवंगत नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्या 102 व्या जन्मदिनाचे औचित्य साधून करण्यात आला आहे. हे संकुल 65 एकरांच्या विशाल परिसरात स्थापन केले गेले आहे.
या स्मारक संकुलात जनसंघ आणि भारतीय जनता पक्षाच्या विख्यात नेत्यांचे भव्य पुतळे आहेत. हे राष्ट्रीय स्मारक संकुल अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित करण्यात आले आहे. या स्थळी भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. शामाप्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाळ उपाध्याय आणि अटलबिहारी वाजपेयी यांचे 65 फूट उंचीचे भव्य पुतळे स्थापन करण्यात आले आहे. तसेच या संकुलात एक संग्रहालय असून ते 98 हजार चौरस फुटांच्या क्षेत्रफळात पसरलेले आहे. या तीन नेत्यांनी भारताच्या निर्माण कार्यात जे अनन्यसाधारण योगदान दिले, त्याचे दर्शन या संग्रहालयात घडते. या नेत्यांशी संबंधित अनेक स्मृती वस्तू या संग्रहालयात पहावयास मिळणार आहेत. देशसेवा, नेतृत्वगुण, सांस्कृतिक संवेदनशीलता आणि सार्वजनिक सेवाभाव या गुणांची प्रेरणा या स्थळापासून भारतीय नागरिकांना, विशेषत: युवावर्गाला मिळत राहील असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
नेत्यांचे गुणगान
या राष्ट्रीय स्मारक संकुलाचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांसमोर भाषण केले. आपल्या भाषणात त्यांनी डॉ. शामाप्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाळ उपाध्याय आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या थोर देशकार्याचे गुणगान केले. या नेत्यांचे कार्य महान असूनही त्यांचा स्वातंत्र्यानंतर यथोचित सन्मान करण्यात आला नाही. त्यांचे कार्य हेतुपुरस्सर दुर्लक्षित ठेवण्यात आले. मात्र, आता आम्ही ही त्रुटी दूर केली आहे, असे प्रतिपादन त्यांनी भाषणात केले.
एकाच ‘कुटुंबा’ची प्रसिद्धी
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशात एकाच विशिष्ट कुटुंबातील नेत्यांना प्रसिद्धी मिळेल, अशी व्यवस्था करण्यात आली होती. राष्ट्रीय प्रकल्पांपासून मार्गांपर्यंत प्रत्येक सार्वजनिक प्रकल्पांना, संस्थांना, योजनांना आणि आस्थापनांना या कुटुंबातील मान्यवर नेत्यांचीच नावे दिली गेली. जणू या नेत्यांशिवाय दुसरे नेते मारतात नाहीत, असा लोकांचा समज व्हावा, अशी व्यवस्था जाणीवपूर्वक करण्यात आली. मात्र, भारतीय जनता पक्षाच्या हाती देशाची सूत्रे आल्यानंतर आम्ही ही एकाधिकारशाही संपवून त्यावेळच्या अन्य अतिथोर नेत्यांच्या कार्याची माहिती जनतेला होईल, अशी व्यवस्था केली आहे. असे त्यांनी आवर्जून स्पष्ट केले आहे.

डॉ. आंबेडकर यांच्यावर अन्याय
काँग्रेसच्या हाती देशाची सत्ता आल्यानंतर घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडेही त्यावेळच्या राज्यकर्त्यांकडून दुर्लक्ष करण्यात आले. त्यांना विरोधक मानण्यात आले. त्यांचा वारसा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण आम्ही या परिस्थितीतही परिवर्तन केले आहे. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दिल्लीपासून लंडनपर्यंतची ‘पंचतीर्थे’ मोठ्या सन्मानाने त्यांची गुणगाथा सांगत नव्या पिढ्यांना प्रेरणा देत आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद मोदी यांनी केले.
सुभाषचंद्र बोस यांनाही महत्व
भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे कार्य अतुलनीय आहे. तथापि, एका कुटुंबाला पुढे आणण्याच्या नादात त्यांच्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले होते. आज आम्ही नेताजींच्या महान देशभक्तीचे स्मरण नव्या पिढीला व्हावे, यासाठी दिल्लीतील कर्तव्यपथावर त्यांचा पुतळा स्थापन केला आहे. देशासाठी त्यांनी केलेला असीम त्याग लोकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे आणखी एक उणीव दूर झाली, अशीही माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.
असे आहे ‘प्रेरणास्थळ’
ड 65 एकरच्या भव्य परिसरात थोर नेत्यांच्या पुतळ्यांची स्थापना
ड 98 हजार चौरस फूट परिसरात सुसज्ज आणि भव्य संग्रहालय
ड देशविकासात थोर नेत्यांच्या योगादानासंबंधी माहिती दिली जाणार
Comments are closed.