अलीगड विद्यापीठातील एका शिक्षकाची हत्या करण्यात आली.

वृत्तसंस्था/अलिगढ (उत्तर प्रदेश)

उत्तर प्रदेशातील अलीगढ मुस्लीम विद्यापीठाच्या एका शिक्षकाची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली आहे. राव दानिश अली असे या शिक्षकाचे नाव आहे. ते बुधवारी रात्री नेहमीप्रमाणे विद्यापीठाच्या परिसरात चालण्यासाठी गेले असताना त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली. ही घटना या विद्यापीठाच्या मौलाना आझाद वाचनालयाच्या नजीक घडली, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

हत्या झाली तेव्हा अली यांच्यासह ===त्यांचे दोन सहकारीही होते. ते चालत असताना स्कूटरवरुन आलेल्या दोन जणांनी त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून थांबविले. त्यांच्यापैकी एकाने अली यांच्यावर जवळून गोळीबार केला. ‘तू मला ओळखत नाहीस, पण आता मी तुझ्या चांगलाच लक्षात राहीन,’ अशा अर्थाची वाक्ये हल्लेखोराने गोळीबार करण्यापूर्वी उच्चारल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे या हत्येचे गूढ वाढले आहे. अली हे या गोळीबारात गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांच्यासमवेत असणाऱ्या सहकाऱ्यांनी त्वरित इतरांना बोलावून घेतले. अली यांना रुग्णालयात नेण्यात आले. पण त्यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला.

सहा पथके स्थापन

अली यांच्या हत्येनंतर विद्यापीठ परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दोन हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी सहा पथकांची स्थापना केली असून परिसर पिंजून काढण्यास प्रारंभ केला आहे. अली यांच्या सहकाऱ्यांचीही चौकशी केली जात आहे. हल्लेखोरांची ओळख अद्याप मिळालेली नाही. तथापि, तपास केला जात आहे, अशी माहिती देण्यात आली. उत्तर प्रदेश प्रशासनानेही हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून लवकरच संशयितांना अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलीसांनी व्यक्त केला आहे. विद्यापीठाच्या सुरक्षित भागात पिस्तुल घेऊन हल्लेखोर आले कसे, याचाही शोध घेतला जात आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

Comments are closed.