बर्फवृष्टीमुळे काश्मीरमधील पर्यटनाला चालना मिळाली आहे.
सर्कल / श्रीनगर
जम्मू-काश्मीरमध्ये हिमपात होण्यास प्रारंभ झाला आहे. त्यामुळे देशभरातील सहस्रावधी पर्यटकांनी काश्मीरकडे आपले लक्ष वळविले असून विमानांचे आणि हॉटेल्सचे बुकिंग जोरावर आहे. या वर्षाच्या पूर्वार्धात पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्याने पर्यटक काहीसे साशंक होते. तथापि, यावेळच्या शीत कालखंडात या प्रदेशात पुन्हा पर्यटनाला बहर येण्याची सुचिन्हे दिसू लागली आहेत.
ख्रिसमसच्या निमित्ताने येथे पर्यटकांची गर्दी उसळली असल्याचे दिसून येत आहे. गुलमर्गप्रमाणेच पहलगाम येथेही पर्यटक मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. त्यांच्या हालचालींमध्ये कोणतीही भीती दिसून येत नाही. दक्षिण भारतातूनही लक्षणीय संख्येने पर्यटक या प्रदेशात येत आहेत. नव्या वर्षाच्या प्रथम दिनासाठी हॉटेल्सचे बुकिंग पूर्ण झाल्याची माहिती देण्यात येत आहे. पर्यटकांच्या या उत्साहामुळे स्थानिक नागरीकांनाही चांगली आर्थिक प्राप्ती होण्याची शक्यता आहे.
कडेकोट सुरक्षा व्यवस्था
या हिमपाताच्या कालखंडात या प्रदेशात मोठ्या प्रमाणात पर्यटक येतील हे गृहित धरुन सुरक्षा व्यवस्थाही सुव्यवस्थित करण्यात आली आहे. विशेषत: ज्या भागांमध्ये पर्यटक प्रामुख्याने जातात, तेथे सुरक्षेची विषेश व्यवस्था करण्यात आल्याचे समजते. तसेच अधिक उत्साही पर्यटक ज्या दुर्गम स्थानी जातात, तेथेही सुरक्षेची व्यवस्था करण्यात येत आहे. पर्यटकांना सुरक्षेसंदर्भात महत्वाच्या सूचना करण्यात येत असून त्यांनी या सूचनांचे काटेकोर पालन करावे आणि सुरक्षा यंत्रणेला सहकार्य करावे, असेही आवाहन प्रशासनाने पर्यटकांना केले आहे.
Comments are closed.