एक कोटी रुपयांचे बक्षीस असलेला नक्षलवादी गणेश उईके मारला गेला

हिडमाच्या खात्म्यानंतर मोठे यश : ओडिशात झाली चकमक

मंडळ संस्था/ कंधमाल

क्रूर नक्षलवादी हिडमाच्या खात्म्यानंतर सुरक्षा दलांना आणखी एक मोठे यश मिळाले आहे. ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात सुरक्षा दलांनी एका मोठ्या चकमकीत नक्षली म्होरक्या गणेश उइकेसमवेत चार नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी ही माहिती दिली. या कामगिरीला नक्षलमुक्त भारताच्या दिशेने मैलाचा दगड अशी उपमा शाह यांनी स्वत:च्या पोस्टमध्ये दिली आहे.

ओडिशाच्या कंधमाल येथे एका मोठ्या मोहिमेत नक्षलींच्या सेंट्रल कमिटीचा सदस्य गणेश उइकेसमवेत 6 नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले आहे. या मोठ्या यशासोबत ओडिशातून नक्षलवाद पूर्णपण्हो संपण्याच्या मार्गावर आहे. आम्ही 31 मार्च 2026 पूर्वी नक्षलवादाला समाप्त करण्यासाठी दृढ संकल्पित आहोत असे शाह यांनी म्हटले आहे.

सीपीआय (माओवादी) सेंट्रल कमिटीचा सदस्य गणेश उइकेसोबत सुरक्षा दलांची चकमक चाकपाड येथील जंगलात झाली. गणेश उइकेवर 1.1 कोटी रुपयांचे इनाम होते. तो ओडिशात प्रतिबंधित संघटनेचा प्रमुख म्हणून काम करत होता. 69 वर्षीय गणेश उइकेची अनेक टोपणनावे होती अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

गणेश उइकेला पक्का हनुमंतु, राजेश तिवारी, चमरू आणि रुपा या नावाने देखील ओळखले जात होते. तो तेलंगणाच्या नलगोंडा जिल्ह्यातील पुल्लेमाला गावाचा रहिवासी होता. चकमकीत दोन महिला नक्षलीही मारल्या गेल्या असून त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. राज्यातील गंजम जिल्ह्याच्या सीमेवरही नक्षलविरोधी मोहीम सुरू असल्याची माहिती ओडिशाचे पोलीस महासंचालक योगेश बहादुर खुराना यांनी दिली.

 

Comments are closed.