पोलीस यंत्रणा आहे की, खाकी वर्दीतली भाजपची टोळी आहे? संजय राऊत यांचा सवाल

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) या युतीची घोषणा झाल्यानंतर राज्यातील राजकारण अधिक तापू लागले आहे. माध्यमांशी शुक्रवारी बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत म्हणाले, भाजपचा पराभव भाजपचे मित्रपक्ष करत असतील तर स्वागतच आहे. सत्तेत असलेले लोक भाजपचा पराभव करण्यासाठी आम्हाला मदत करत असतील तर त्याचं स्वागत केलं पाहिजे असं म्हणत राऊतांनी सध्याच्या राज्यातील परिस्थितीवर सडकून टीका केली.
सध्याच्या घडीला राज्यामध्ये अतिशय अंदाधुंदीचं वातावरण आहे. गुंडागर्दी, दहशतवाद, यंत्रणेचा गैरवापर अशा प्रकारची वृत्ती ही फोफावली आहे. महाराष्ट्राच्या कॅबिनेटमधील एक मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा फरार आहे. महाड निवडणुकीतील राड्याप्रकरणी मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले याचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला. तरीही अद्याप त्याला अटक का करण्यात आली नाही? असा प्रश्न राऊतांनी उपस्थित केला. मंत्र्यांच्या मुलांवर कारवाई का होत नाही, त्यांना अभय का दिले जात आहे, सरकारी यंत्रणेचा गैरवापर होत असल्याचा आरोप करत राऊतांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
मंत्री तसेच मंत्र्यांच्या मुलांनी खून केले, दरोडा टाकला तरी त्यांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलिस महासंचालक यांनी अभय दिलं आहे का? असा खरमरतीत सवाल यावेळी राऊत यांनी विचारला. राज्याचा एक मंत्री बेपत्ता होतो. माणिकराव कोकाटे हे 48 तास बेपत्ता झाले, मग पोलिस यंत्रणा काय करतेय? ही पोलीस यंत्रणा आहे की, भाजपची खाकी वर्दीतली टोळी आहे असा सडेतोड सवाल यावेळी राऊत यांनी उपस्थित केला.
कोणालाही सोडणार नाही असं म्हणतं तुम्ही विधानसभेत भाषणं देता ना, मग मंत्र्यांची मुलं, त्याचे भाऊ, बाप, कसे सुटतात असे म्हणत राऊत यांनी सरकारवर खरमरीत टीका केली. साताऱ्यातल्या ड्रगच्या कारखान्याचं काय झालं? याचे खरे सूत्रधार कोण आहेत हे सर्व देवेंद्र फडणवीस यांना माहीत आहे. परंतु संबंधित मंत्री एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवींसांसमोर गुडघ्यावर बसले. एकनाथ शिंदे यांच्या भावाची ती जागा आहे. केवळ इतकेच नाही तर, मुंबईतील एका माजी पोलिस अधिकाऱ्याचा देखील या कारखान्यासंबंधातील बाबींमध्ये समावेश आहे.
या राज्यामध्ये नेमकं चाललंय तरी काय? भाजप गुंडाचं राज्य चालवंतय असे म्हणत संजय राऊत यांनी सरकारला चांगलाच टोला लगावला. महाडमधील कॅबिनेट मंत्र्याचा मुलगा फरार आहे तो कुठे आहे हे मला ठाऊक आहे. फडणवीसांनी सातारा ड्रग्सच्या टोळीला अभय दिलं आहे. नशेचा पैसा राजकारणात आणला जातोय. महाराष्ट्राच्या तरुणांना नशेबाज केलं जातंय असं म्हणत राऊत यांनी राज्यातील विविध प्रश्नांवर प्रकाशझोत टाकला.

Comments are closed.