कोहलीचा रौद्र अवतार; चौकार-षटकारांची आतषबाजी, गुजरातला धो-धो धुतलं!
विजय हजारे ट्रॉफी 2025-26 मध्ये दिल्ली आणि गुजरात यांच्यातील महत्त्वाच्या लढतीत क्रिकेटप्रेमींना विराट कोहलीची खास झलक पाहायला मिळाली. गुजरातचा कर्णधार चिंतन गजाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि दिल्लीला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. सामन्याच्या सुरुवातीपासूनच दिल्लीच्या डावात चढ-उतार पाहायला मिळाले, मात्र विराट कोहलीने आपल्या अनुभवाच्या जोरावर डाव सावरत संघाला मजबूत स्थितीत नेले.
दिल्लीने पाच विकेट गमावून 159 धावा केल्या असताना कोहली क्रीजवर ठामपणे उभा होता. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस उतरलेल्या कोहलीने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत गुजरातच्या गोलंदाजांवर दबाव टाकला. मैदानाच्या चारही बाजूंना फटके खेळत त्याने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. कोहलीने अवघ्या 61 चेंडूंमध्ये 77 धावांची खेळी साकारली, ज्यात 13 चौकार आणि एक शानदार षटकार यांचा समावेश होता.
शतकापासून तो थोडक्यात दूर राहिला असला, तरी त्याची ही खेळी दिल्लीसाठी अत्यंत महत्त्वाची ठरली. विशाल जयस्वालच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात कोहली चुकला आणि यष्टिरक्षक उर्विल पटेलने त्याला स्टंप आऊट केले. त्यानंतर कोहलीला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले, मात्र तोपर्यंत त्याने संघाला भक्कम पाया देण्याचे काम केले होते.
याआधीच्या सामन्यातही कोहलीने आपल्या फॉर्मची झलक दाखवली होती. आंध्र प्रदेशविरुद्ध त्याने 101 चेंडूंमध्ये 131 धावांची जबरदस्त खेळी करत 14 चौकार आणि 3 षटकार लगावले होते. त्या शतकी खेळीच्या जोरावर दिल्लीला विजय मिळवून देण्यात त्याचा मोठा वाटा होता.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही कोहलीचा फॉर्म उल्लेखनीय राहिला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत त्याने एकूण 302 धावा करत दोन शतके झळकावली होती. त्या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्याला ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ पुरस्काराने गौरवण्यात आले. कसोटी आणि टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर सध्या त्याचे संपूर्ण लक्ष एकदिवसीय क्रिकेटवर केंद्रित आहे. 2027 च्या वनडे विश्वचषकासाठी तो स्वतःला पूर्णपणे तयार करत असून, विजय हजारे ट्रॉफीतील त्याची कामगिरी हेच त्याचे स्पष्ट संकेत देत आहे.
Comments are closed.