कंपनी विकल्यानंतर अमेरिकन सीईओने कर्मचाऱ्यांना वाटले 2 हजार कोटी रुपये, सोशल मीडियावर मालकावर कौतुकाचा वर्षाव
अमेरिकेत लुईझियाना येथील एका कंपनीचा मालक कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आला. त्याने आपल्या कर्मचाऱ्यांना कंपनी विकून त्यातील प्रत्येकाला लाखो डॉलर्सचे बोनस चेक दिले. ही रक्कम थोडी थोडकी नसून तब्बल 240 दशलक्ष डॉलर्स इतकी होती. या मालकाने आपली कंपनी 1.7 अब्ज डॉलर्सना विकल्यानंतर हा उदारपणा दाखवला. त्यामुळेच सध्याच्या घडीला सोशल मीडियावर या कंपनीच्या मालकाची वाहवा केली जात आहे.
फायबरबॉन्डचे आता माजी सीईओ असलेले ग्रॅहम वॉकर यांनी ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ला सांगितले की, जर संभाव्य खरेदीदार ईटनने विक्रीच्या रकमेपैकी १५% रक्कम कर्मचाऱ्यांसाठी राखून ठेवली नसती, तर त्यांनी कंपनी विकण्यास सहमती दर्शवली नसती. या वर्षीच्या सुरुवातीला जेव्हा ईटनने फायबरबॉन्डचे अधिग्रहण केले, तेव्हा हा करार पूर्ण झाला. यामुळे 540 पूर्ण-वेळ असलेल्या कामगारांना बोनस म्हणून काही ठराविक रक्कम देण्यात आली. सरासरी प्रत्येक कामगाराला पाच वर्षांच्या कालावधीत सुमारे 443, 000 डॉलर्स मिळाले.
फायबरबॉन्डचे माजी सीईओ ग्रॅहम वॉकर यांनी अशी अट घातली होती की, त्यांच्या कौटुंबिक कंपनीच्या विक्रीतून मिळालेल्या रकमेपैकी 15 % रक्कम थेट कर्मचाऱ्यांना दिली जावी. ‘द जर्नल’नुसार, दीर्घकाळ काम केलेल्या कर्मचाऱ्यांना याहून खूप जास्त रक्कम मिळाली. जून महिन्यापासून कर्मचाऱ्यांना त्यांच्या वैयक्तिक बक्षिसांचा तपशील असलेली सीलबंद पाकिटे मिळू लागली. त्यापैकी काही जण भारावून गेले, तर इतरांना तो एक गंमतीचा प्रकार वाटला, असे द जर्नलने वृत्त दिले.
फायबरबॉन्डमध्ये 29 वर्षे काम केलेल्या आणि 1995 मध्ये प्रति तास 5.35 डॉलर्स वेतनावर सुरुवात केलेल्या लेसिया म्हणाल्या की, त्यांना पत्र उघडल्यावर अश्रू अनावर झाले, असे म्हटले आहे. सध्या त्या 51 वर्षांच्या असून, त्यांनी फायबरबॉन्डच्या 254 एकरच्या कॅम्पसमधील सुविधांची देखरेख करण्यापर्यंत प्रगती केली होती. त्या 18 जणांच्या टीमचे व्यवस्थापन करत होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी आपल्या बोनसचा वापर करून गृहकर्ज फेडले आणि जवळच्या शहरात कपड्यांचे बुटीक सुरू केले. एका कर्मचाऱ्याने आपल्या पैशांचा वापर करून आपल्या संपूर्ण कुटुंबाला मेक्सिकोमधील कॅनकून येथे सहलीला नेले. इतरांनी क्रेडिट कार्डची बिले भरली, रोख पैसे देऊन गाड्या विकत घेतल्या. व्हिएतनाममधून आलेल्या आणि फायबरबॉन्डच्या लॉजिस्टिक्स विभागात 15 वर्षांहून अधिक काळ काम केलेल्या ब्लॅकवेल यांनी सांगितले की, त्यांनी त्यांच्या बोनसचा काही भाग वापरून पतीसाठी टोयोटा टॅकोमा गाडी विकत घेतली आणि बाकीचे पैसे बाजूला ठेवले. ब्लॅकवेल म्हणाल्या की, करांमध्ये मोठी रक्कम गेली जवळजवळ 1000,000 डॉलर्स होती.
Comments are closed.