आरोग्य विमा पोर्टेबिलिटीसाठी काय करावे आणि काय टाळावे? वाचा तज्ज्ञांचं मत
आरोग्य विमा: आरोग्य विम्याचे (आरोग्य विमा) क्षेत्र भारतामध्ये वेगाने बदलते आहे. यातही चांगली गोष्ट म्हणजे, तुमच्या गरजांनुसार योग्य निर्णय घेण्यासाठी तुमच्याकडे पूर्वीपेक्षा अधिक अधिकार आहेत. तुमच्याकडील असलेल्या साधनांपैकी सर्वात मोठे साधन म्हणजे पोर्टेबिलिटी. थोडक्यात, तुमच्या सध्याच्या आरोग्य परिस्थितीचा, आजारांचा प्रतीक्षा कालावधी किंवा प्रयत्नपूर्वक मिळवलेल्या नो-क्लेम बोनस अशा गोष्टींमध्ये बदल न होता तुम्ही विमा कंपनी बदलू शकता.
असे असले तरी दुसऱ्या कंपनीमध्ये आपली पॉलिसी पोर्ट करणे म्हणजे घाईघाईने करण्याची गोष्ट नाही. अनेकदा लोकांना वाटते की, पोर्ट करणे हे नवीन प्लॅन घेण्याइतकेच सोपे आहे. पण हे त्यापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे. यासाठी तुम्हाला योग्य वेळेची वाट पाहावी लागेल, तुमची आवश्यक ती कागदपत्रे व्यवस्थित ठेवावी लागतील आणि तुम्ही कशासाठी नोंदणी करत आहात याची तुम्हाला माहिती असायला हवी. जर तुम्ही तुमचा आरोग्य विमा पोर्ट करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही काय करावे आणि काय टाळावे, हे येथे सांगितले आहे.
काय करावे?
१. सुरुवात लवकर करा. शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहू नका. पॉलिसी नूतनीकरणासाठी येण्यापूर्वी किमान महिनाभर किंवा दोन महिने आधी पोर्टेबिलिटी प्रक्रिया सुरू करा. विमा कंपन्यांना तुमची सध्याची पॉलिसी तपासण्यासाठी, आतापर्यंत केलेले दावे पाहण्यासाठी आणि वैद्यकीय नोंदींचे पुनरावलोकन करण्यासाठी एवढ्या वेळेची गरज असते. जर तुम्ही उशीर केलात आणि वेळ हातात नसेल तर पॉलिसी खंडित होण्याचा किंवा संधी पूर्णपणे गमावण्याचा धोका असतो.
2. तुमच्या सध्याच्या पॉलिसीचा आढावा घ्या आणि त्यातील त्रुटी शोधा. तुमचा सध्याचा प्लॅन खरोखरच अपुरा आहे का? तुम्हाला क्लेमच्या मर्यादा, खोलीच्या भाड्यावरील मर्यादा किंवा अपुऱ्या कव्हरेजमुळे समस्या येत आहेत का, अशा गोष्टींचा दुसरी पॉलिसी घेण्यापूर्वी विचार करा. नेमकी कोणती त्रुटी आहे ते पाहा, जेणेकरून तुम्ही असा नवीन प्लॅन शोधू शकाल जो तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या गरजा खऱ्या अर्थाने पूर्ण करेल.
3. तुलना करा, अभ्यास करा. ऑनलाइन साधनांचा वापर करा किंवा सल्लागाराशी बोला आणि बाजारात काय उपलब्ध आहे ते पहा. सर्वात स्वस्त प्रीमियमच्या मागे धावू नका, तर क्लेम सेटलमेंट रेशो, नेटवर्कमधील रुग्णालयांची संख्या, ग्राहक सेवा आणि मातृत्व किंवा ओपीडी कव्हरसारख्या अतिरिक्त सुविधांचा सखोल अभ्यास करा. व्यवस्थित अभ्यास केल्याने तुम्ही तात्काळ फायद्यासाठी दीर्घकालीन मूल्याशी तडजोड करणे टाळता.
4. तुमचे कागदपत्र व्यवस्थित तयार ठेवा. तुम्हाला तुमच्या सध्याच्या पॉलिसीची प्रत, नूतनीकरणाच्या पावत्या, कोणतेही वैद्यकीय अहवाल आणि आधीच्या दाव्यांचा तपशील लागेल. अर्ज करण्यापूर्वी सर्व माहिती अद्ययावत आणि अचूक असल्याची खात्री करा. अपूर्ण माहितीमुळे प्रक्रिया संथ होते.
५. तुमच्या आरोग्याची योग्य माहिती द्या. तुमच्या तब्येतीबद्दल आणि तुम्हाला सध्या असलेल्या किंवा पूर्वी असलेल्या कोणत्याही आजारांबद्दल नेहमी खरी माहिती द्या. माहिती लपवल्यास तुमचा दावा नाकारला जाऊ शकतो किंवा तुमची नवीन पॉलिसी रद्द होऊ शकते. वैद्यकीय तपासणीद्वारे विमा कंपन्या याची खात्री करून घेण्याची शक्यता असते.
6. तुमचे सातत्यपूर्ण फायदे लेखी स्वरूपात द्या. तुमचा प्रतीक्षा कालावधीचा लाभ, नो-क्लेम बोनस आणि आधीपासून असलेल्या आजारांसाठीचे संरक्षण कायम ठेवणे हा पोर्टेबिलिटीचा उद्देश आहे. तुमच्या नवीन पॉलिसीमध्ये या सर्व गोष्टी स्पष्टपणे नमूद केल्या आहेत याची खात्री करा. अन्यथा, तुम्हाला अनेक वर्षांच्या फायद्यांना मुकावे लागण्याचा धोका असतो.
काय टाळावे?
१. शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहू नका. लोकांची ही सर्वात मोठी चूक असते. जर तुम्ही खूप उशिरा सुरुवात केली, तर तुमची मागणी वेळेवर पूर्ण होणार नाही. त्यामुळे तुम्हाला काही काळ विना विमा राहावे लागेल किंवा तुम्हाला आणखी वर्षभर जुन्याच पॉलिसीवर अवलंबून राहावे लागेल.
2. फक्त स्वस्त आहे म्हणून कोणतीही योजना निवडू नका. कमी प्रीमियम असलेल्या योजनांमध्ये अनेकदा काही गोष्टींची कमतरता असते. उदा. अनेक गोष्टींचा समावेश नसणे, कमी विमा संरक्षण मर्यादा किंवा दाव्यांचे कठीण निकष. नेहमी संपूर्ण पॅकेजचा विचार करा, केवळ किमतीचा नाही. पोर्टेबिलिटी म्हणजे केवळ पैसे वाचवणे नव्हे, तर अधिक चांगले संरक्षण मिळवणे.
3. नवीन विमा कंपनीच्या बारीक अक्षरातील अटींकडे दुर्लक्ष करू नका. प्रत्येक कंपनीचे अंडररायटिंग वेगवेगळ्या पद्धतीने असते. तुमची नवीन विमा कंपनी तुमच्या आरोग्याच्या स्थितीनुसार अतिरिक्त प्रतीक्षा कालावधी, जास्त प्रीमियम किंवा काही गोष्टी वगळणे (एक्सक्लूजन) लागू करू शकते. कंपनी बदलल्यानंतर कोणतीही नवीन गोष्टी समोर येऊ नये, यासाठी सर्व काही काळजीपूर्वक वाचा.
4. तुमचा क्लेमचा इतिहास लपवू नका. जर तुम्ही यापूर्वी क्लेम केला असेल, तर त्याबद्दल सांगा. पोर्टेबिलिटीमुळे तुमचे विमा संरक्षण सुरू राहते, पण त्यामुळे तुमचा जुना रेकॉर्ड पूर्णपणे पुसला जात नाही. जर तुम्ही आधीचे क्लेम लपवण्याचा प्रयत्न केला, तर तुमची नवीन विमा कंपनी तुमचा अर्ज नाकारू शकते किंवा नंतर क्लेम नाकारू शकते.
५. तुमची जुनी पॉलिसी लवकर रद्द करू नका. तुमची नवीन पॉलिसी सक्रिय झाल्याची खात्री झाल्यावरच जुनी पॉलिसी रद्द होऊ द्या. अगदी थोड्या कालावधीचा खंड पडला तरीही तुमची अडचण होऊ शकते. हा असा धोका आहे जो तुम्हाला पत्करायचा नाही.
6. पोर्टेबिलिटी आपोआप होईल असे गृहीत धरू नका. नवीन विमा कंपनीच्या योग्य तपासणीनंतर, स्वीकृतीवर पोर्टेबिलिटी अवलंबून असते. जर तुमची जोखीम प्रोफाइल जास्त मानली गेली किंवा कागदपत्रे अपूर्ण असतील, तर तुमचा अर्ज नाकारला जाऊ शकतो. विमा संरक्षणाशिवाय राहणे टाळण्यासाठी, नूतनीकरणाचा पर्यायी मार्ग तयार ठेवा.
निष्कर्ष
उत्तम सेवा, अधिक व्यापक संरक्षण किंवा अधिक वाजवी किंमत शोधणाऱ्या पॉलिसीधारकांसाठी आरोग्य विमा पोर्टेबिलिटी ही एक मौल्यवान संरक्षण यंत्रणा आहे. त्यासाठी माहितीपूर्ण निर्णय आणि वेळेवर अंमलबजावणी आवश्यक आहे. केवळ सोयीसाठी केलेला बदल म्हणून या प्रक्रियेकडे न पाहता, तुमचे आरोग्य संरक्षण सुधारण्याची एक संधी म्हणून याकडे पाहा.
काय करावे आणि काय टाळावे हे समजून घेतल्याने विमा कंपन्यांमधील बदल सुरळीत आणि फायदेशीर होईल याची खात्री करू शकता. महत्त्वाचे म्हणजे जागरूकतेमुळे तुमच्या आरोग्य सुरक्षेमध्ये कोणताही अडथळा येणार नाही.
– शशांक चाफेकर, मुख्य वितरण अधिकारी – मणिपालसिग्ना हेल्थ इन्शुरन्स
खालील आरोग्य साधने पहा-
तुमचा बॉडी मास इंडेक्स (BMI) मोजा
वय कॅल्क्युलेटरद्वारे वयाची गणना करा
Comments are closed.