रिंकू सिंगचा तडाखा! 176 च्या स्ट्राईक रेटने ठोकलं वादळी शतक, टी-20 वर्ल्ड कपपूर्वी जबरदस्त कामगिरी

विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Vijay Hajare trophy) उत्तर प्रदेशचा कर्णधार रिंकू सिंगने (Rinku Singh) चंदीगडविरुद्ध वादळी शतक झळकावत आपला फॉर्म दाखवून दिला आहे. रिंकूच्या शतकापूर्वी सलामीवीर आर्यन जुयालने 134 धावांची खेळी केली, ज्याच्या जोरावर उत्तर प्रदेशने 367 धावांचा डोंगर उभा केला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना चंदीगडचा संघ अवघ्या 140 धावांत गारद झाला.

रिंकू सिंगने अवघ्या 56 चेंडूंत आपले शतक पूर्ण केले. त्याने 60 चेंडूंत 176.67 च्या स्ट्राईक रेटने 106 धावा केल्या. या खेळीत त्याने 11 चौकार आणि 4 उत्तुंग षटकार मारले. आर्यन जुयालने 134 धावा केल्या, तर ध्रुव जुरेलने 67 धावांचे योगदान दिले.

उत्तर प्रदेशच्या जीशान अंसारीने भेदक गोलंदाजी करत 7 षटकांत 29 धावा देऊन 4 विकेट्स घेतल्या.
विपराज निगमने 2 विकेट्स घेत त्याला चांगली साथ दिली. चंदीगडचा संघ या धावसंख्येपुढे पूर्णपणे हतबल दिसला आणि उत्तर प्रदेशने हा सामना 227 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला.

रिंकू सिंगच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेश संघाने आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. या विजयासह यूपीचा संघ इलीट ‘बी’ ग्रुपमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. याआधी त्यांनी हैदराबादचा 84 धावांनी पराभव केला होता.

टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या संघात रिंकूची निवड योग्यच होती, हे त्याने या खेळीतून पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. 28 वर्षीय रिंकूने भारतासाठी आतापर्यंत 25 टी-20 सामन्यात 550 धावा केल्या असून, त्याची सरासरी आणि स्ट्राईक रेट आंतरराष्ट्रीय स्तरावरही जबरदस्त आहे.

Comments are closed.