न्यूझीलंड मालिकेपूर्वी संघनिवडीची धाकधूक; कधी होणार घोषणा?

वर्ष 2026ची सुरुवात भारतीय क्रिकेटसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. नववर्षातील पहिल्याच आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी 3 किंवा 4 जानेवारी रोजी टीम इंडियाची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर 11 जानेवारीपासून न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. नवीन वर्षातील पहिली संघनिवड, नवे कॉम्बिनेशन आणि नवे दावेदार यामुळे क्रिकेट चाहते तसेच तज्ज्ञांचे लक्ष या निवडीकडे लागले आहे.

ही मालिका केवळ द्विपक्षीय सामना म्हणून पाहणे चुकीचे ठरेल. आगामी मोठ्या स्पर्धांमध्ये टीम इंडियाचा कणा बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूंना स्वतःला सिद्ध करण्याची ही सुवर्णसंधी आहे. विशेषतः शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर या दोन खेळाडूंवर निवड समितीची विशेष नजर असणार आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, बीसीसीआय 3 जानेवारी रोजी 2026 सालातील पहिल्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करू शकते. अजित आगरकर, शिव सुंदर दास, अजय रत्रा, आर. पी. सिंग आणि प्रज्ञान ओझा यांचा समावेश असलेली निवड समिती ऑनलाइन बैठकीत यावर चर्चा करणार आहे. याआधी 20 डिसेंबरला निवड समितीने 2026 टी-20 विश्वचषकासाठी 15 सदस्यीय संघासह टी-20 आंतरराष्ट्रीय संघ जाहीर केला होता.

वनडे संघाचा कर्णधार शुभमन गिल आणि उपकर्णधार श्रेयस अय्यर यांच्याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित आहे. दुखापतीमुळे दोघेही दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मागील मालिकेत सहभागी होऊ शकले नव्हते. गिलला पुन्हा दुखापत झाली होती, मात्र आता तो पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे. विजय हजारे ट्रॉफीसाठी तो मोहालीच्या पीसीए स्टेडियममध्ये सराव करताना दिसला असून, न्यूझीलंडविरुद्ध तो संघाचे नेतृत्व करेल, यात शंका नाही.

मात्र, गिलचा फॉर्म कसा असेल याकडे सगळ्यांचे लक्ष असेल, कारण त्याला टी-20 विश्वचषकासाठी भारतीय टी-20 संघातून वगळण्यात आले आहे. दुसरीकडे, श्रेयस अय्यरच्या फिटनेसबाबत अजूनही साशंकता आहे. त्याने बेंगळुरू येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये हजेरी लावून नेट्समध्ये फलंदाजी सुरू केली असली, तरी न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी त्याला पूर्णपणे फिट घोषित केले जाईल की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Comments are closed.