वैभव सूर्यवंशी विजय हजारे ट्रॉफीचे उर्वरित सामने खेळणार नाही? जाणून घ्या कारण

अवघ्या 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) क्रिकेटच्या मैदानात आपल्या फलंदाजीने अशी जादू केली आहे की, आता त्याचा गौरव थेट देशाच्या राजधानीत केला जाणार आहे. बुधवारीच वैभव दिल्लीला पोहोचला असून, प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित विशेष सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्याला ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदीही या खेळाडूंशी संवाद साधतील.

विजय हजारे ट्रॉफीमध्ये अरुणाचल प्रदेशविरुद्ध खेळताना वैभवने अवघ्या 84 चेंडूंत 190 धावांची तुफानी खेळी केली. यासह त्याने लिस्ट-ए क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात शतक झळकावण्याचा 39 वर्षांपूर्वीचा पाकिस्तानी खेळाडूचा जागतिक विक्रम मोडीत काढला.

आता वैभव सूर्यवंशी हा लिस्ट-ए आणि टी-20 या दोन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात शतक झळकावणारा जगातील पहिला फलंदाज बनला आहे.

या पुरस्कार सोहळ्यामुळे वैभव विजय हजारे ट्रॉफीचे उर्वरित सामने खेळू शकणार नाही. मात्र, या कार्यक्रमानंतर तो लगेच भारतीय अंडर-19 (U19) संघासोबत झिम्बाब्वेला रवाना होईल. 15 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या अंडर-19 वर्ल्ड कपसाठी तो भारतीय संघाचा मुख्य कणा असणार आहे.

नुकत्याच झालेल्या अंडर-19 आशिया कपमध्ये वैभवने युएईविरुद्ध 171 धावांची मोठी खेळी केली होती. मात्र, त्यानंतरच्या सामन्यांत त्याला फारशी चमक दाखवता आली नाही. फायनलमध्ये भारताला पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला होता. आता वर्ल्ड कपमध्ये आपली कसर भरून काढण्यासाठी वैभव सज्ज झाला आहे.

Comments are closed.